मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यावर ‘सेटलमेंट’ चा आरोप केल्यानंतर दोघांमधील संबंध ताणले गेले असताना मनसे आमदारांनी खडसे यांच्या दारी जाऊन मतभेद दूर केले आणि विरोधकांमधील ‘सुसंवाद’ पर्व शुक्रवारी पुन्हा सुरु झाले.
राज ठाकरे यांनी खडसेंवर आरोप केल्याने भाजपमध्ये संतापाचे वातावरण होते. दोन्ही पक्षांमधील संबंध ताणले गेल्याने अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेत्यांकडे होणाऱ्या बैठकीवर मनसेचा बहिष्कार होता. पण ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी मतभेद दूर करण्याचे आवाहन केले आणि माजी केंद्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भोजन घेतले. त्यामुळे तणावाचे वातावरण निवळले. मनसे गटनेते बाळा नांदगावकर आणि आमदार शिशिर शिंदे यांनी अधिवेशन सुरू झाल्यावर प्रथमच खडसे यांच्या दारी जाऊन त्यांची भेट घेतली. मनसेची भूमिका समजावून सांगितली आणि खडसेंची समजूत घातली. त्यांचे चहापान झाल्यावर सुसंवादाचे पर्व सुरू झाले. विरोधी पक्षांनी गुरूवारी विधानसभा बंद पाडून राज्यपालांची भेट घेतली, त्यावेळीही मनसे आमदारांनी विरोधी पक्षांना साथ दिली होती. आजही पुन्हा भेट घेतल्याने विरोधकांमधील सुसंवाद पुन्हा सुरू झाला.
माझ्या दृष्टीने मतभेद मिटल्याचे मी आधीच जाहीर केले होते, असे खडसे यांनी सांगितले. तर राजकारणात कोणी कोणाचा कायम शत्रू नसतो, असे सूचक वक्तव्य नांदगावकर यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा