Raj Thackeray Voting: महाराष्ट्र विधानसभेसाठी २८८ जागांवर आज (२० नोव्हेंबर) मतदान होत आहे. लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी राज्यात मतदानाची प्रक्रिया पार पडत असताना जास्तीत जास्त लोकांनी मतदानासाठी बाहेर पडावं, यासाठी राजकीय नेते आवाहन करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदारांना घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केलं. तसेच वरळी विधानसभा मतदारसंघात राज ठाकरेंच्या नावाने एक पत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शिवसेना (शिंदे) गटाला मनसेचा पाठिंबा असल्याचे बोललं जात आहे. त्यावर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली.
ते व्हायरल पत्र खोटं
“वरळी विधानसभेत व्हायरल झालेलं पत्र खोटं आहे, आम्ही कोणत्याही गटाला पाठिंबा दिलेला नाही. आम्ही आमच्यासाठी निवडणूक लढवत आहोत. वरळीकर मतदार सूज्ञ आहेत. ते योग्य तो निर्णय घेतील”, असे राज ठाकरे म्हणाले.
लोकसभेवेळी मतदानाचा टक्का कमी होता, यावेळी तो वाढेल का? असा प्रश्न माध्यमांनी राज ठाकरेंना विचारला. यावर ते म्हणाले, “मतदान जितकं कमी होईल, तितकं त्यांच्या (मतदारांच्या) पदरी काय पडेल, हे मागच्या पाच वर्षांत आपण पाहिलं. लोकांनी अधिकाधिक मतदान करावं. आपलं मत व्यक्त करण्यापासून मागे हटायला नको.”
तसेच मागच्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात हल्ले आणि पैसे वाटण्याच्या घटना घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला. तसेच अनेक अपक्ष उमेदवारांवर हल्ला करण्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी पैसे वाटप करताना काही जणांना रंगे हात पकडण्यात आले आहे. तर कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आलेली आहे. यावरही राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, मी मागेच मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात सांगितले होते. आजपर्यंत निवडणुकांमध्ये जे पाहायला मिळाले नाही, ते या निवडणुकीत पाहायला मिळेल. आता राज्यात तसेच होताना दिसत आहे.
हे ही वाचा >> “आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं, आता पुढील पाच वर्षे…”, मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, पोस्ट करत म्हणाले…
अमित ठाकरेंना मतदान करून कसं वाटलं?
राज ठाकरे यांनी माहीम विधानसभा मतदारसंघात मतदान केले. यावेळी त्यांना माध्यमांनी अमित ठाकरेंना मतदान करून कसं वाटलं? असा प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, मी आजवर अनेकवेळा मतदान केले आहे. आजही मतदान केलं. मतदान करून नेहमीच चांगलं वाटतं.