मागील काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबई आणि महाराष्ट्राबाबत एका वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मारवाडी आणि गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाही. तसेच, आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे, ती सुद्धा पुसेल, असं राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटलं होतं. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यपाल कोश्यारी यांचा समाचार घेतला आहे.
“आपलं वय काय आपण, बोलतो काय? राज्यपाल पदावर बसला आहे, म्हणून मान राखतोय. नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही. राज्यपाल कोश्यारी यांनी गुजराती आणि मारवाडी समाजाला विचारावं, तुम्ही तुमचे राज्य सोडून महाराष्ट्रात का आला. तुमच्या राज्यात का नाही व्यापर केला, उद्योग धंदे थाटले. याचं कारण, उद्योग आणि व्यापर करण्यासाठी महाराष्ट्रासारखी सुपीक जमीन कोठे नव्हती,” असे राज ठाकरेंनी म्हटलं.
“हा देश नव्हता तेव्हा या भागाला हिंद प्रांत म्हटलं जायचे. या हिंद प्रांतावर अनेक आक्रमणे झाली. पण, मराठेशाहीने या हिंद प्रांतावर सव्वाशे वर्षे राज्य केलं. महाराष्ट्र पहिल्यापासून समृद्ध होता. आता या गुजराती आणि मारवाडी लोकांना सांगितलं, आता तुमच्या राज्यात जाऊन उद्योग करा. तर हे जातील का? आजही परदेशातील कोणताही उद्योग देशात यायचा असेल तर पहिल्यांदा महाराष्ट्राला प्राधान्य देतो,” असे राज ठाकरेंनी सांगितलं.