मुंबईतील बेस्टच्या कंत्राटी कामगारांच्या समस्यांसंदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. बेस्टच्या कंत्राटी कामगारांना काही महिन्यांपासून पगार नाही. यासाठी आदित्य ठाकरेंना लाज वाटली पाहिजे, अशी टीका देशपांडे यांनी केली. मराठी माणसं देशोधडीला लागले असताना शिवसेनेनं गुजरात्यांना कंत्राट दिल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला.
शिवसेनेनं गुजरातच्या कंपनीला कंत्राट का दिलं? या कंपनीशी सेनेचे लागेबांधे काय? असा सवाल देशपांडे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केला. संदीप देशपांडेंच्या या आरोपांवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पलटवार केला आहे. “सौ चूहे खा के बिल्ली हज को चली” असं म्हणत पेडणेकर यांनी देशपांडेंना टोला लगावला आहे. गुजरातच्या कंपनीला दिलेल्या कंत्राटाबाबत बेस्टच्या सनदी अधिकाऱ्यांकडे चौकशी करावी, असा सल्लाही त्यांनी मनसेला दिला. “तुम्हाला उठसूठ भ्रष्टाचारच दिसतोय” असेही पेडणेकर मनसेला संबोधून यावेळी म्हणाल्या.
“हेच उद्धवसाहेबांनी केलं असतं तर…”, शिवसेनेची फडणवीसांवर टीका
दरम्यान, बेस्टच्या कंत्राटी कामगारांचा पगार गेल्या अनेक महिन्यांपासून रखडला आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. येत्या ५ सप्टेंबरपर्यंत पगार न मिळाल्यास कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पाठिंबा दिला आहे. ५ सप्टेंबरपर्यंत कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यास बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांना कॅबिनमध्ये बसू न देण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.