MNS Leader Sandeep Deshpande on Attack : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला आले असताना हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्यांना अज्ञात आरोपींनी स्टम्पच्या साहाय्याने मारहाण केली. या हल्ल्यानंतर संदीप देशपांडेंना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर त्यांना आरामासाठी घरी सोडण्यात आलं. यावेळी त्यांनी या हल्ल्यावर पहिली प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संदीप देशपांडे म्हणाले, “आम्ही कुणालाही घाबरत नाही, घाबरणार नाही. असा घाबरवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. आम्ही कुणालाही भीक घालत नाही. यामध्ये कोण लोक आहेत हे सर्वांना माहिती आहे.”

“अशा हल्ल्यांना मी घाबरणार नाही”

“अशा हल्ल्यांना मी घाबरणार नाही. मी माझं काम करत राहील. ज्यांना वाटतं मी या हल्ल्याने घाबरेल त्यांना मी स्पष्टपणे सांगतो की, याने मी घाबरणार नाही,” असंही संदीप देशपांडेंनी नमूद केलं.

नेमकं काय घडलं?

संदीप देशपांडे मॉर्निंग वॉकसाठी शिवाजी पार्कमध्ये गेले होते. तेव्हा शिवाजी पार्कमध्ये असलेल्या एका टोळक्याने संदीप देशपांडे यांच्यावर स्टम्पच्या साहाय्याने हल्ला केला. या हल्ल्यात देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : ‘राजसाहेब एक म्हण आठवली “कपटी भावा पेक्षा…”’; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ पत्रानंतर संदीप देशपांडेंच ट्वीट

टोळक्याने केलेल्या हल्ल्यानंतर संदीप देशपांडेंना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. हल्लेखोरांबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. या घटनेचा पोलीस तपास करत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns leader sandeep deshpande first reaction on attack while morning walk at shivaji park mumbai pbs