MNS Leader Sandeep Deshpande on Nair Hospital Molestation : कोलकाता रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. याप्रकरणाची चौकशी सुरू असतानाच मुंबईतील नायर रुग्णालयातही प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीचा लैंगिक छळ झाला आहे. याप्रकरणी संबंधित सहयोगी प्राध्यापकाला पालिका प्रशासनाने निलंबित केलं आहे. मात्र, यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यावरून एक्स पोस्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“काल नायर वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना भेटलो. सगळेजण प्रचंड दहशतीखाली आहेत. नायरची वाटचाल कोलकात्ताच्या दिशेने होत आहे. महापालिका प्रशासनाने हे संवेदनशीलपणे हाताळले पाहिजे. नंतर कपाळाला हात लावून उपयोग नाही” असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

नायर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने सहयोगी प्राध्यापकाने लैंगिक छळ केल्याचा आरोप करून त्याबाबत तक्रार केली होती. रुग्णालय स्तरावरील लैंगिक छळ प्रतिबंधक समितीने या प्रकरणी चौकशी केली. तसेच, कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंध प्रमुख अंतर्गत तक्रार समिती व सावित्रीबाई फुले स्त्री संसाधन केंद्र समिती यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. या लैंगिक छळ तक्रार प्रकरणात अतिरिक्त तक्रारी प्राप्त झाल्या असून या प्रकरणाची चौकशी महापालिका मुख्यालय स्तरावरील ‘कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक समिती’कडे हस्तांतरित करण्यात आली आहे. या घटनेची आणि तक्रारीची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी व्हावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा >> नायर रुग्णालय विनयभंग प्रकरण : निलंबित डॉक्टराविरोधात आणखी १० विद्यार्थिनींच्या तक्रारी

सावित्रीबाई फुले महिला संसाधन केंद्राअंतर्गत तक्रार समिती आणि कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक समितीमार्फत ही चौकशी करण्यात आली. यावेळी उपस्थित राहिलेल्या विद्यार्थिनींपैकी १० विद्यार्थिनीनी सहाय्यक प्राध्यापकाविरोधात तक्रारी दाखल केल्या. नायर रुग्णालयातील अंतर्गत समितीने सहाय्यक प्राध्यापक डॉ. भेटे यांची अन्य महाविद्यालयात बदली करण्याची शिफारस केली होती. मात्र मुंबई महानगरपालिकेने डॉ. भेटे यांचे थेट निलंबन केले. तसेच या प्रकरणाची चौकशी सावित्रीबाई फुले महिला संसाधन केंद्राकडे सोपवून उच्चस्तरीय चौकशी करण्यास सांगितले. त्यानुसार २५ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांकडून लेखी तक्रारी मागवल्या होत्या. त्यानंतर तक्रारी आलेल्या विद्यार्थिनींना साक्ष देण्यासाठी गुरुवारी सुनावणीसाठी बोलविण्यात आले होते. विद्यार्थिनींव्यतिरिक्त तीन कर्मचारीही सुनावणीसाठी उपस्थित होते.

सुनावणीदरम्यान गुरुवारी अनेक विद्यार्थिनी तक्रारी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीसमोर आल्या. आम्ही सहायक प्राध्यापक, तसेच अधिष्ठाता यांच्याविरोधात पुरावे दिले आहेत. या पुराव्यांच्या आधारे समितीने योग्य ती कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्रात राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशारा असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न (अस्मि) या आंतरवासिता करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संघटनेने दिला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns leader sandeep deshpande meet nair hospital molestation vicitm students and warn to maharashtra government sgk