महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने निशाणा साधला जात आहे. राज्य सरकारच्या आणि विशेषत: शिवसेनेच्या अनेक धोरणांवर आक्षेप घेत मनसेकडून त्या धोरणांचा निषेध देखील केला जात आहे. नुकतीच राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली असून त्यावरून आता मनसेनं राज्य सरकारला जाब विचारला आहे. ट्विटरवर यासंदर्भात एक फोटो शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य करण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानेवर नुकतीच शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या नियमित कामाला देखील सुरुवात केली आहे. शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच शनिवारी मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्वांसमोर आले. नगरविकास खात्याच्या बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेशी देखील संवाद साधला. यावेळी राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानंतर मनसेनं खोचक शब्दांत टीका केली आहे.

काय आहे घोषणा?

शनिवारी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना मोठा दिलासा देणारी घोषणा केली. यामध्ये मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंत घरं असणाऱ्या सर्वांना मालमत्ता करांमधून सूट देण्याचा निर्णय़ जाहीर करण्यात आला आहे. “२०१७ मध्ये शिवसेनेने वचननामा दिला होता. त्यातील अनेक वचने पूर्ण केले आहेत. पण मुंबईकरांसाठी ५०० फूटांपर्यंत मालमत्ता कर रद्द करण्याचे वचन विचारपूर्वक दिले होते. ५०० चौ. फुटापर्यंतच्या घराच्या मालमत्ताकर माफ करणे हे महत्वाचे वचन आपण आज पूर्ण करत आहोत”, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं.

मनसेचा खोचक निशाणा

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर संदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज आपल्या ट्विटरवरून एक खोचक ट्वीट केलं आहे. यामध्ये एक चित्र पोस्ट करण्यात आलं असून त्यावर “घरच नाही, तर कर कुणाचा माफ करणार?” असा सवाल करण्यात आला आहे.

“आम्ही तोंडातून वाफा काढत नाही, जे बोलतो ते करतो”; मुंबईकरांसाठी मोठी भेट देत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं

काय आहे चित्रामध्ये?

संदीप देशपांडे यांनी शेअर केलेल्या या चित्रामध्ये काही कोळी बांधव ‘आवक विभाग’ अशी पाटी लिहिलेल्या कार्यालयासमोर उभं राहून दाद मागताना दिसत आहेत. “मराठी माणसाला मुंबईतून वसई-विरारला हद्दपाल केलं. आता भूमिपुत्राची अवस्था तीच करणार आहात का?” असा सवाल हे कोळीबांधव विचारत आहेत. समोरच्या कार्यालयाच्या दरवाजात मुख्यमंत्र्यांसारखी दिसणारी व्यक्ती उभी असून त्यांच्या हातात ‘कोस्टल रोड मच्छिमार्केट’, असं लिहिलेली बॅग दाखवण्यात आली आहे.

या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर मनसेनं कोळीबांधवांचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns leader sandip deshpande mocks cm uddhav thackeray 500 sq feet house tax pmw