‘आप’चा धमाका आणि नरेंद्र मोदींचा करिश्मा या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच मनसे लोकसभा निवडणुकीसाठी कसोशीने आढावा घेत असून गुरुवारी नाशिक येथे राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनसेचे महाराष्ट्रातील सर्व संपर्क अध्यक्ष, आमदार, सरचिटणीस तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमुळे महायुतीत सामील न होता मनसे स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढेल, असे संकेत मिळत आहेत.
मनसेच्या या बैठकीत संपर्क अध्यक्षांकडून लोकसभा मतदारसंघनिहाय अहवाल घेण्यात येणार असून लोकसभा तसेच आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून सखोल चर्चा करण्यात येणार असल्याचे मनसेच्य एका ज्येष्ठ आमदाराने सांगितले. लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आता जोर लावला असून ‘आम आदमी पार्टी’विषयी जनसामान्यांमध्ये असलेल्या कुतूहलाचा किती फटका बसेल याचाही आढावा घेण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी ‘कृष्णभुवन’ या निवासस्थानी झालेल्या मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत पक्षाची भूमिका काय असेल याबाबत राज यांनी संबंधितांची मते जाणून घेतली तसेच नाशिक येथील बैठकीत राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा आढावा संपर्क अध्यक्षांना सादर करण्यास सांगितले. यावेळी मतदारसंघनिहाय अन्य पक्षांचे बलाबल आणि मनसेची ताकद याचाही विचार केला जाणार आहे.  मनसे स्वतंत्रपणे लढल्यास एकाचवेळी काँग्रेस-राष्ट्रवादी, महायुती व आपचा सामना करावा लागणार असून त्यादृष्टीने पक्षबांधणीचाही आढावा घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्रातील सर्व मतदारासंघात बूथनिहाय गटाध्यक्षांच्या नियुक्ती करण्याचे आदेश सप्टेंबरमध्येच मुंबईतील एका बैठकीत राज यांनी मनसेच्या सर्व विभाग अध्यक्षांना तसेच पदाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह प्रमुख शहरांमधील याद्या तयार करण्यात आल्या असून महाराष्ट्रात जवळपास सर्वच्या सर्व जागा लढण्याच्या दृष्टीने तयारी सुरू असल्याचे मनसेच्या ज्येष्ठ आमदाराने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा