आजचा दिवस राज्याच्या राजकारणात चिपी विमानतळावरुनच गाजला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद जगजाहीर आहे. त्यामुळेच चिपी विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर अप्रत्यक्षपणे जोरदार फटकेबाजी केली. दुसरीकडे मनसेने देखील मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे यांनी ८ तास स्वतः गाडी चालवून पंढरपूरला गेले, तसेच आता मुंबई-गोवा महामार्गावरुन चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला जावं, असं मत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केलं. त्यांनी ट्विट करत हा टोला लगावला.

राजू पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री साहेब 8 तास गाडी चालवून पंढरपूरला गेले होते.तेव्हा त्यांचं खूप कौतुक झालं होतं. आता अजून एकदा चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला मुंबई-गोवा महामार्गाने जावे एवढीच अपेक्षा.”

दरम्यान, सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा आज (९ ऑक्टोबर) पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करून सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील चिपी येथील विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व इतर सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

हेही वाचा : “आदित्य ठाकरे माझ्या दृष्टीने टॅक्स फ्री” म्हणत नारायण राणेंनी दिला ‘हा’ सल्ला!

कार्यक्रमाच्या ठिकाणी केलेल्या भाषणामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आपल्यामुळेच सिंधुदुर्गचा विकास झालाय, येथील विकासकामांना विरोध करणारे आज मंचावर बसलेत अशापद्धतीची वक्तव्य केली. नारायण राणेंनी शिवसेनेच्या भूमिकेवर तसेच राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीवर टोलेबाजी केली. राणेंनंतर भाषणासाठी उभ्या राहिलेल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामधून राणेंच्या टीकेचा खास ठाकरे शैलीमध्ये समाचार घेतला.

आजचा हा क्षण आदळआपट करण्याचा नाही

उद्धव ठाकरे भाषणासाठी उभे राहिले असता शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरु केली. बराचवेळ घोषणाबाजी थांबत नसल्याचं पाहून उद्धव ठाकरेंनी, “आजचा हा क्षण आदळआपट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा आहे,” असं म्हटलं. हे वाक्य कार्यकर्त्यांना म्हटलं असलं तरी उद्धव यांच्याआधी भाषण देणाऱ्या राणेंच्या दिशेने त्यांचा रोख होता. तसेच पुढे बोलताना उद्धव यांनी पुन्हा एकदा, “पाठांतर करून बोलणे वेगळे, मळमळीने बोलणं वेगळं असतं,” म्हणत राणेंच्या भाषणावर अप्रत्यक्ष टीका केली.

हेही वाचा : Chipi Airport : “ज्यांनी विरोध केला ते स्टेजवरच आहेत, किती भांडं फोडायचं?” उद्घाटन कार्यक्रमातच नारायण राणेंचा सवाल!

बाळासाहेबांनी खोट बोलणाऱ्यांना बाहेर काढलं…

नारायण राणे म्हणजे त्याप्रमाणे खरोखरच बाळासाहेबांना खोटं बोलणारी माणसं आवडत नव्हती. म्हणूनच त्यांनी खोटं बोलणाऱ्यांना शिवसेनेतून बाहेर काढलं, असा टोलाही उद्धव यांनी लगावला. “शिवसेना आणि कोकणचे नाते मी सांगायला नको. शिवसेना प्रमुखांचे मस्तक कुठेही नाही पण कोकणच्या या भूमीत नतमस्तक झाले आहे,” असं पुढे बोलताना उद्धव म्हणाले. आजचा हा महत्वाचा दिवस आहे.आजच्या या विमानतळाच्या उद्घाटनानंतर कोकणची संपन्नता जगासमोर जाणार आहे. याठिकाणी जगातले लोक यावे असे वाटत असेल तर सुविधा हव्यात. पर्यटन म्हटले की गोव्याचे नाव येते, आपण काही गोव्याच्या विरोधात नाही पण कोकणचे आपले ऐश्वर्य काकणभर जास्तच आहे,” असं म्हणत उद्धव यांनी कोकणाच्या निर्सगाचं कौतुक केलं.