लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होतील. या निवडणुकीसाठी शिवसेना, भाजपासह महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे पक्ष कामाला लागले आहेत. या तिन्ही पक्षांचं मुंबईत मोठं प्रस्थ आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मुंबईवर विशेष प्रेम आहे. निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आधीच दिले आहेत. गेल्या आठवड्यात मनसेचा १७ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी राज यांनी दावा केला की, “आगामी महापालिका निवडणुका झाल्यास मनसे सत्तेत असेल.”
दरम्यान, राज यांनी वर्धापन दिनाच्या सभेत फारसं राजकीय भाष्य केलं नाही. त्यावेळी राज म्हणाले की, ते मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलतील. २२ मार्च रोजी हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याची मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाने या मेळाव्यासाठी आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एक स्फूर्तीगीत देखील तयार केलं आहे. याची एक झलक मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटरवर शेअर केली आहे.
या गाण्याच्या सुरुवातीला “टायगर अभी जिंदा हैं!” असे शब्द ऐकायला मिळतात. “करू तय्यारी रे, घेऊ भरारी रे, राजमुद्रा ही मिरवूया” असे या गाण्याचे बोल आहेत. अमेय खोपकरांनी जारी केलेला हा या स्फूर्तीगीताचा दुसरा टीझर आहे.
हे ही वाचा >> “महाविकास आघाडीसंदर्भातल्या ‘त्या’ बातम्या खोडसाळ”, काँग्रेस नेत्यांकडून भूमिका स्पष्ट
राज ठाकरे यांचा भाजपाला इशारा
मनसेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे म्हणाले होते की, “भाजपाने एक गोष्ट लक्षात ठेवावी, आता भरती आहे, उद्या ओहोटी येणार, हे नैसर्गिक आहे आणि हे कोणी थांबवू शकणार नाही.” त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ असा लावला जात आहे की, आगामी काळात महापालिका निवडणुकीच्या वेळी मनसे आणि भाजपाची युती होण्याची शक्यता नाही.