बलात्काराच्या आरोपाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मलबार हिल विधानसभा मतदारसंघातील विभाग अध्यक्ष वृशांत वडके यांना अटक करण्यात आली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये तिकीट मिळवून देण्याचं आमिष दाखवून एका महिलेवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप वडके यांच्यावर करण्यात आला आहे. या आरोपांनंतर अटक झाल्याच्या पार्श्वभूमीवर वडके यांनी स्वत: राज ठाकरेंना लिहिलं एक पत्र समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंबई महानगरपालिकेचे तिकीट देतो, असे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप मनसेचे नेते वृशांत वडकेंवर करण्यात आला आहे. वडकेंवर बलात्कारासोबतच संबंधित महिलेला धमकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे. वडके यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप ४२ वर्षीय महिलेने केला आहे. सप्टेंबर २०२१ ते जुलै २०२२ या कालावधित वडके यांनी आपल्याशी शारीरिक संबंध ठेवत आमिष दाखवून फसवणूक केली. तसेच येणाऱ्या मनपा निवडणुकीत तिकीट मिळवून देण्याचेही आमिष वडकेंनी दाखवले, असा आरोप या महिलेने केला आहे. महिलेने पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केल्यानंतर वडकेंना अटक करण्यात आली आहे.

“सन्माननीय राजसाहेब ठाकरे आपणास सस्नेह जय महाराष्ट्र” असं म्हणत पत्रातील मजकूर लिहिण्यात आला आहे. “साहेब माझ्या काही वैयक्तिक कारणामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. कृपया तो स्वीकारावा. फक्त तुमचा आणि तुमचाच वृशांत वडके,” असा मजकूर या पत्रामध्ये आहे. या पत्राचा विषय ‘विभाग अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याबाबत’ असा आहे.

वडकेंना अटक केल्यानंतर हे पत्र समोर आलं असलं तरी ते सात तारखेलाच लिहिण्यात आल्याचं पत्रावरील तारखेवरुन स्पष्ट होत आहे. मागील दोन आठवड्यांमध्ये महिलांविरोधातील तक्रारींसंदर्भात मनसेच्या पदाधिकाऱ्यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागण्याची ही दुसरी वेळ आहे. गणेशोत्सवादरम्यान बॅनर लावण्याच्या वादातून एका महिलेवर हात उगारल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वीच राज यांनी पक्षातून एका पदाधिकाऱ्याची हकालपट्टी केली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns office bearer vrushant wadke arrested in rape case wrote letter to party chief raj thackeray scsg