मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे न हटवल्यास त्यांच्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याची भूमिका पाडवा मेळाव्यातून जाहीर केली होती. या भूमिकेमुळे राज्यभर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात दावे-प्रतिदाव्यांचं राजकारण रंगलेलं असतानाच वसंत मोरेंच्या रुपानं मनसेमध्ये अंतर्गत राजकारण देखील रंगल्याचं पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर आज रामनवमीच्या निमित्ताने दादरमध्ये मनसेकडून थेट शिवसेना भवनाच्या समोरच भोंगा लावून हनुमान चालिसा वाजवण्यात आली. याद्वारे शिवसेनेला हिंदुत्वासाठी जागं करण्याचा प्रयत्न असल्याचं मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी सांगितलं. यानंतर दादर पोलिसांनी किल्लेदार आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“ज्यांनी हिंदुत्व बासनात गुंडाळून ठेवलंय…”

दरम्यान, अशा प्रकारे शिवसेना भवनासमोर भोंगा लावून हनुमान चालीसा पठण करून शिवसेनेलाच डिवचण्याचा प्रयत्न मनसेकडून करण्यात आल्याचं बोललं जात आहे. “मुळात ज्यांनी हिंदुत्व बासनात गुंडाळून ठेवलंय, त्यांना देखील जाग यावी हा देखील त्यामागचा उद्देश आहे”, अशी प्रतिक्रिया यशवंत किल्लेदार यांनी यावेळी दिली आहे.

“आज रामनवमीचा सण आहे. राज ठाकरेंनी जसं सांगितलंय, की सगळे सण उत्साहात साजरे व्हायला हवेत. विविध ठिकाणी आमच्या विभागात राम नवमीचा उत्सव साजरा होत आहे. त्यांना प्रेरणा देण्यासाठी आम्ही हा रथ तयार केला आहे. ज्या ज्या उत्सव मंडळांकडून किंवा मंदिरांकडून आमच्याकडे रथासाठी मागणी होईल, तिथे आम्ही हा रथ पाठवू. तिथे हनुमान चालिसाचं पठण होईल”, असं किल्लेदार म्हणाले.

“तुम्ही सत्तेसाठी लाचारी पत्करली”

दरम्यान, यासंदर्भात यशवंत किल्लेदार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “ज्या शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आपलं हिंदुत्व सोडून दिलं. बाळासाहेबांची हयात ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोध करण्यात गेली, त्या पक्षांसोबत ते जाऊन बसले आणि सत्ता स्थापन केली, त्यांना देखील या रथाच्या माध्यमातून मी संदेश देऊ इच्छितो की तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व सोडून लाचारी स्वीकारली आहे. ती बंद करा आणि देशधर्मासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन राष्ट्राचं निर्माण करुयात”, असं देखील किल्लेदार म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns on shivsena bhawan loudspeaker hanuman chalisa on ram navmi yashwant killedar pmw