पर्युषणाच्या काळात पालिकेकडून घालण्यात आलेल्या मांसविक्रीवरील बंदीच्या विरोधात गुरूवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) थेट रस्त्यावर उतरली. मनसेने दादरच्या आगर बाजार भागात मासे आणि चिकन विक्रीचे स्टॉल लावून पालिकेच्या निर्णयाला जोरदार विरोध दर्शविला. मनसेचे दादरमधील नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. या स्टॉलवर तब्बल १०० किलो चिकन, सुरमई, पापलेट, बोंबील, मांदेली, कोळंबी विनामूल्य विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. नागरिकांकडून मनसेच्या या मासेविक्रीला जोरदार प्रतिसाद मिळाल्याचा दावा स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, काही काळानंतर हा स्टॉल अनधिकृत असल्याचे सांगत पोलिसांनी या स्टॉलवर कारवाईचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी संदीप देशपांडे यांच्यासह मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, कालपासून शिवसेनेनेही याविषयी आक्रमक भूमिका घेत पर्युषण काळात मांसविक्रीवर बंदी घालून देणार नसल्याचे ठणकावून सांगितले होते. मांसविक्रीच्या मुद्दय़ावरून सर्व राजकीय पक्षांनी विरोधी भूमिका घेतल्याने भाजप एकाकी पडला आहे. दीड वर्षांने होणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्व राजकीय पक्षांनी आपापले वर्चस्व दाखविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात हा मुद्दा आणखी तापण्याची चिन्हे आहेत.
मांसविक्री बंदीविरोधात मनसेचा ‘मासळीबाजार’, कार्यकर्ते आणि पोलीसांमध्ये बाचाबाची
मांसविक्रीवरील बंदीच्या विरोधात गुरूवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) थेट रस्त्यावर उतरली.
Written by रोहित धामणस्कर
Updated:
First published on: 10-09-2015 at 15:04 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns open fish stall against bmc meat ban