मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिवाजीपार्क येथे पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार असून यावेळी विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर कविता वाचन करणार आहेत. तसेच महाराष्ट्राचे राजवस्त्र असलेली पैठणी कशी विणतात हे पाहण्याची संधी या कार्यक्रमात मिळणार आहे.

मराठी भाषदिनानिमित्त शिवाजी पार्कवर मनसेतर्फे पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. नामांकित प्रकाशकांच्या पुस्तकांचे १०५ स्टॉल्स या प्रदर्शनात मांडण्यात येणार असून हे पुस्तक प्रदर्शन गुरुवार, २७ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू असेल. गुरुवारी संध्याकाळी पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार असून यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या आवडीच्या कविता वाचन करणार आहेत. तसेच विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर यावेळी कविता वाचन करणार आहेत.

‘आदान प्रदान’अंतर्गत घरातील जुने पुस्तक आणि दहा रुपये देऊन कोणतेही पुस्तक वाचकांना घेता येणार आहे. अनेक शाळकरी तसेच महाविद्यालयीन विध्यार्थी तसेच लाखो पुस्तकप्रेमी प्रदर्शन पाहायला येण्याची शक्यता असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय पैठणी कशी विणली जाते हेही या ठिकाणी पाहायला मिळणार असल्याचे मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी सांगितले.

Story img Loader