राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची हवी होती ती मिळाली नाही म्हणून ते तोडफोड करतात. नालायक माणूस जेव्हा स्वतःला लायक ठरवण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा तो तोडफोडच करतो असा आरोप मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत तनुश्री दत्ताने केला आहे. त्यामुळे नाना पाटेकर-तनुश्री दत्ता वादाला आता नवं वळण मिळालं आहे. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी म्हणजेच मनसे कार्यकर्त्यांनी माझी कार फोडली असा आरोप तनुश्री दत्ताने केला होता. एवढंच नाही तर नाना पाटेकरांनी मला मनसे कार्यकर्त्यांना हाताशी धरून धमकावण्याचा प्रयत्न केला असेही तनुश्रीने म्हटले होते. आता मात्र तिने थेट राज ठाकरेंवरच आरोप केले आहेत.
तनुश्री दत्ताची पत्रकार परिषद (सौजन्य यु ट्यूब)
मनसेची भाषा कायम तोडफोडीची आहे. राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची हवी होती. ती मिळाली नाही, त्यामुळे ते चिडले आहेत त्यांना ‘सरकार राज’ आणायचे आहे स्वतःला सिद्ध करायचे आहे. नाना पाटेकर हा चिंधी अभिनेता आहे त्याने आणि राज ठाकरेंनी एकत्र येत मला छळलं असा आरोप तनुश्री दत्ताने केला. राज ठाकरे गुंड आहे, त्याने आपल्यासारखेच गुंड पक्षात घेतले आहेत त्यांना तो तोडफोड करण्यासाठी ठिकठिकाणी पाठवत असतो असाही आरोप तनुश्री दत्ताने केला आहे. नेता तो असतो जो कमकुवत, कमजोर माणसाना संरक्षण देतो. महिलांवर हल्ला करणारा नेता नसतो, असेही तनुश्री दत्ताने म्हटले आहे.
नाना पाटेकर कॅरेक्टर आर्टिस्टच राहिला त्याला कोणतीही अभिनेत्री कोणतीही मुलगी भाव देत नाही. त्यामुळे तो मुलींसोबत गैरवर्तन करतो. हिरोच्या आसपास अनेक मुली घुटमळताना दिसतात.नाना पाटेकरजवळ तुम्ही एका तरी मुलीला फिरकताना पाहिलं आहे का? असाही प्रश्न तनुश्री दत्ताने विचारला आहे. एक नालायक माणूस आणि एक अभिनेता बनता बनता मागे राहिलेला माणूस यांनी अभद्र युती केल्यावर काय होणार? महिलांना त्रासच होणार त्यांची छेडछाडच केली जाणार असेही तनुश्रीने म्हटले आहे. मुंबईत तनुश्री दत्ताने एक पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली त्यामध्ये तिने आपले हे विचार बोलून दाखवले आणि राज ठाकरेंना गुंड म्हणत त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या.