ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत आम्ही कोणाकडे मदत मागायला गेलो नव्हतो, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य आम्हाला मदत करायला आले होते. मनसे हा स्वतंत्र्य पक्ष आहे. मनसेचे सदस्य कधी कुठे जातील हे तुम्ही तरी सांगू शकता का, असा टोला गुरुवारी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत लगावला. राज्यात कोठेही सत्ता स्थापन करताना मनसेची मदत घेऊ नका किंवा त्यांच्या मदतीला जाऊ नका, असे स्पष्ट आदेश कॉग्रेस पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. राष्ट्रवादीने मनाचा मोठेपणा दाखवून आघाडी धर्म पाळला तर दोन्ही पक्षांना नको त्या तडजोडी कराव्या लागत नाहीत, असा टोलाही ठाकरे यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला.
कॉग्रेस पक्षाच्या कोकण विभागीय मेळाव्याचे ठाण्यातील टीपटॉप प्लॉझा येथे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी राष्ट्रवादीसह मनसेवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. राज्यातील जनता कॉग्रेसच्या विचारांना मतदान करते. समविचारी पक्ष असल्यामुळे आघाडीला त्याचा फायदा मिळतो, याचा विचार राष्ट्रवादीच्या नवनियुक्त तरुण नेतृत्वाने करायला हवा. राज्यातील सहा जिल्हापरिषदांमध्ये राष्ट्रवादीने शिवसेना-भाजपशी हातमिळवणी केली असून ही युती त्यांनी तोडावी, अशी मागणी आम्ही वेळोवेळी केली आहे.
एका विचारावर ठाम राहील्यामुळे राज्यात कॉग्रेसच्या जागांमध्ये सतत वाढ झाली, मात्र शिवसेना-भाजपसह मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या जागाही घटल्या. लोकसभेची आगामी निवडणुक आम्ही समविचारी पक्षासोबत लढविण्याच्या मनस्थितीत असून राज्यातील लोकसभेच्या २६ जागांवर निवडणुक लढविण्याची तयारी कॉग्रेसने सुरु केली आहे, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.
ठाण्यात स्थायी समिती निवडणुकीत मनसेच्या एका निर्णायक मतामुळे कॉग्रेसचे रविंद्र फाटक यांचा विजय सुकर झाला. त्यावर बोलताना आम्ही मनसेकडे मदत मागायला गेलो नव्हतो, तेच आम्हाला मदत करायला आले असे त्यांनी सांगितले.