पुतळे उभारुन स्मारके बांधणे मनसेला अमान्य आहे. भावी पिढय़ांना महापुरुषांचे स्मरण राहावे यासाठी लोकोपयोग प्रकल्पांना त्यांची नावे द्यावी, अशी मागणी मनसेतर्फे शुक्रवारी करण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे इंदू मिलमध्ये स्मारक उभारावे, अशी मागणी मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी गुरुवारी पालिका सभागृहामध्ये केली. त्यामुळे दलित बांधवांच्या भावना दुखावल्या असून सर्वत्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाची मनसेचे कार्याध्यक्ष राज ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे.
संदीप देशपांडे यांनी केलेली मागणी वैयक्तीक असून त्याचा मनसेशी कोणताही संबंध नाही, असे पक्षाचे सरचिटणीस अनिल शिदोरे यांनी प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे. या संदर्भात राज ठाकरे सांगतील तीच पक्षाची भूमिका असेल. पुतळे-स्मारके उभारण्यापेक्षा लोकोपयोगी कामांना महत्त्व देण्याची आवश्यकता आहे. महापुरुषांची नावे द्यावयाची असतील तर ती लोकोपयोगी प्रकल्पांना द्या, असेही त्यांनी आपल्या पत्रकात स्पष्ट केले.
संदीप देशपांडे यांच्याबरोबरच काँग्रेस नगरसेवक सुनील मोरे यांनीही बाळासाहेब ठाकरे यांचे इंदू मिलमध्ये स्मारक उभारण्याची मागणी केली होती. तसेच काँग्रेस नगरसेविका नैना सेठ यांनीही दादर रेल्वे स्थानकाला शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्याची मागणी केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत काँग्रेसने सुनील मोरे यांच्यावर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. तसेच काँग्रेस नगरसेवकांनी केलेली मागणी व्यक्तीगत असून त्याच्याशी काँग्रेसचा संबंध नाही, असे पालिकेतील विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी स्पष्ट केले.
महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमणार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याबाबत, तसेच दादर रेल्वे स्थानक, नवी मुंबई येथील विमानतळ आदींना त्यांचे नाव देण्याबाबत सर्वपक्षिय नगरसेवकांकडून मागणी करण्यात आली आहे. काँग्रेस आणि मनसेच्या नगरसेवकांनी केलेल्या मागणीमुळे वाद निर्माण झाला आहे. या सर्वानी केलेल्या मागण्यांचा र्सवकष विचार करण्यासाठी महापौर सुनील प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात येणार आहे. या समितीमध्ये स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, विविध पक्षांचे गटनेते आदींचा समावेश असेल. नगरसेवकांनी केलेल्या मागण्यांबाबत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून ही समिती योग्य तो निर्णय घेणार आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा