महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये हिंदुत्ववादाची भूमिका मांडताना मशिदींवरील भोंग्यांना विरोध करतानाच हे भोंगे काढण्याची मागणी केली. असं झालं नाही तर आम्ही या मशिदींसमोर हनुमान चालीसा लावू असं राज यांनी म्हटल्यानंतर राज्यातील वेगवगेळ्या भागांमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी तसे प्रयत्न केले. मात्र पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केल्याचं दिसून आलं. याच मुद्द्यावरुन आता मनसेनं थेट दादरमधील शिवसेना भावनासमोर बॅनर लावलं असून त्यामधून राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

नक्की वाचा >> “मशिदीच्या भोंग्यावर कारवाई करायला सांगितले होते; ED ने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच…”; संजय राऊतांना मनसेचा खोचक टोला

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दादर -माहिम प्रभादेवी विधानसभा क्षेत्रातील मनसेच्यावतीने शिवसेना भवनासमोर उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरेंचा फोटो असणारा बॅनर लावण्यात आलाय. या बॅनरवरील मजकुरामध्ये राज ठाकरेच बाळासाहेबांचा खरा वारसा जपत असल्याचं सांगत उद्धव ठाकरेंना लक्ष्य करण्यात आलंय. “माननीय बाळासाहेब, बघा आपले सुपुत्र मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हिंदू असून हनुमान चालिसा म्हणायला बंदी घालताहेत. हिंदूंनी लावलेले भोंगे काढताहेत. आपला ठाकरी बाणा आणि वारसा खऱ्या अर्थाने फक्त राज ठाकरे चालवत आहेत. जमल्यास उद्धवजींना हिंदूंबाबत सुबुद्धी द्या,” असा मजकूर या बॅनरवर लिहिलेला आहे. सध्या हा बॅनर चर्चेचा विषय ठरतोय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: BJP युपीसहीत एकूण १८ राज्यांमध्ये सत्तेत पण एकाही राज्यात भोंग्यांवर बंदी नाही; गुजरातमध्ये तर न्यायालयाने…

मशिदीवरील भोंग्यासंदर्भात कर्नाटकात आंदोलन सुरू  झाले आहे. राज्यातील भाजपा नेत्यांनीही या विषयावरून वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्याचा आणि समाजात अस्वस्थता निर्माण करण्यासाठी हे केले जात आहे. प्रक्षोभक विधाने आणि कृत्यांवर राज्याची पोलीस यंत्रणा लक्ष ठेवून आहे, असा इशारा भाजपा-मनसेला देत महाराष्ट्रात अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी गृह विभाग दक्ष असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले आहे.

नक्की वाचा >> पुण्यातील मनसे शहराध्यक्षांचा राज यांना घरचा आहेर; भोंगे लावण्यास नकार देत म्हणाले, “राजसाहेबांचं भाषण कळलंच नाही, आम्ही…”

मशिदीवरील भोंगे काढण्याची मागणी भाजपाच्या नेत्यांनी केल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही तो विषय घेत आक्रमक भूमिका जाहीर केल्यानंतर आता रमझान महिना सुरू झाल्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मंगळवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर राज्यात अनुचित घटना घडणार नाही, असा विश्वास गृहमंत्र्यांनी व्यक्त केला.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: सुप्रिया सुळेंनी करुन दिली २१०० कोटींच्या प्रकरणाची आठवण तर अजित पवार म्हणाले, “राज ठाकरे पलटी मारणारा…”

राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेची आढावा बैठक घेतली. राज्यात सर्वत्र परिस्थिती नियंत्रणात आहे. सर्व पोलीस अधिकारी आपापल्या भागात योग्य ती काळजी घेत आहेत. आगामी काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस दल प्रयत्न करत आहे. जनतेनेही त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns place banner against cm uddhav thackeray in front of shivsena bhavan mumbai scsg