सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष दसरा मेळाव्यावर आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिंदे गट आणि शिवसेनेमधील संघर्ष अजून वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, मनसेने दसरा मेळाव्यात विचार नाही, तर नाटकं पाहायला मिळतील अशी टीका केली आहे. मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना दसरा मेळाव्यात ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांचं वस्त्रहरण करतील अशी टीका केली आहे. दोन्ही गटाला समर्थन देणाऱ्या पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे असंही ते म्हणाले.
“पहिल्यांदाच असं होणार आहे की, ज्यांचे जास्त लोक असतील तेच खरी शिवसेना असं ठरणार आहे. विचार ऐकायला कोणीच येणार नाही. आज विचारांना काहीच महत्त्व नाही, येथे वस्त्रहरणच होणार आहे. सोनं वैगेरे नाही, एकमेकांच्या अंगावरील चिंध्याच गोळा कराव्या लागतीत अशी परिस्थिती आहे, दोन्ही मेळावे यशस्वी होणं हे आयोजकांपेक्षा त्यांच्या मागे जी शक्ती त्यांची मोठी गरज आहे. त्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे,” असं प्रकाश महाजन म्हणाले आहेत.
“उद्या शिवतीर्थावरील मेळावा यशस्वी झाला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा कमी होणार आहे. पण यशस्वी झाल्यास नैतिक धैर्य वाढेल. बीकेसीतील मेळावा यशस्वी झाला नाही तर भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागेल, त्यामुळे हे मेळावे यशस्वी करण्याची गरज त्या संयोजक, आयोजकांपेक्षा इतरांना जास्त आहे. यावरच महाराष्ट्राचं राजकारण ठरणार आहे. अंधेरी विधानसभा निवडणूक, मुंबई कोणाच्या हातात जाणार यासाठी दोन्ही गटांच्या मागे असणारी शक्ती मेळावे यशस्वी व्हावेत यासाठी प्रयत्न करतील,” असा दावा प्रकाश महाजन यांनी केला आहे.
“शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे जो मेळावा घ्यायचे ती परंपरा कायम ठेवायची की नाही हे आव्हान आहे. बाळासाहेबांवर आपली निष्ठा आहे हे दाखवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न असेल. दुसरीकडे शिंदे गटाला सत्तेत असल्याचा फायदा आहे. १३०० बसेस बुक केल्याचं याआधी पाहिलं नव्हतं. एक मंत्री मी ३०० बसेस घेऊन जाणार असल्याचं सांगत आहे. हा सत्तेतून मिळणाऱ्या पैशाचा वापर आहे. शिंदेंसोबत बाहेर पडलेल्यांना आणि ज्यांच्यासोबत बाहेर पडलेत त्यांना हा मेळावा यशस्वी करावा लागणार आहे. शिंदेंसमोर आणि शिंदे समर्थकांसमोरही हे आव्हान आहे,” असं प्रकाश महाजन म्हणाले आहेत.