मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेणार आहेत. ही भेट नेमकी कशासाठी आहे, हे अद्याप उघड झाले नसले तरी अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच या भेटीमुळे अनेक राजकीय चर्चांनाही उधाण आहे. या बैठकीत शिंदे गटाचे मंत्रीही उपस्थित राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
मनसे यापूर्वी अंधेरी पोटनिवडणुकीत तठस्थ राहणार असल्याची माहिती होती. तसेच राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली असून अशा परिस्थिती मनसेला मोठी संधी आहे, असे मनसेच्यावतीने सांगण्यात आले होते. तसेच अंधेरी पोटनिवडणुकीबाबत बोलताना, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. ”कोणाचे आकस्मिक निधन झाले असल्यास अशा जागांवर मनसे पोटनिवडणूक लढवत नाही. त्यामुळे कोणाला पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही”, असे ते म्हणाले होते.
हेही वाचा – “अंधारात तीर मारणाऱ्या…” शालिनी ठाकरेंनी पेडणेकरांचा ‘कांदे बाई’ उल्लेख करत उडवली खिल्ली!
दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर राज ठाकरे अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिंदे गटाला पाठिंबा देतात का? याचबरोबर आगामी मनपा निडणुकीसाठी या दोघांध्ये युतीबाबत काही चर्चा होईल का? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.