मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोलिसावंर हल्ले करणाऱ्यांवर फोडून काढलं पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. करोनामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पोलिसांचं खच्चीकरण करुन सध्या चालणार नाही. पोलिसांच्या चुका दाखवण्याची ही वेळ नाही. १२-१३ तास ते काम करत आहेत असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“पोलिसांवर हल्ले कऱणाऱ्यांवर फक्त केसेस टाकून चालणार नाही तर यांना फोडून काढलं पाहिजे. त्याचे व्हिडीओ व्हायरल केले पाहिजेत. मी एक व्हिडीओ पाहिला ज्यामध्ये घरातील लोकांनी मिळून पोलिसांना मारलं. भेंडी बाजारमध्ये पोलिसांना शिव्या घातल्या जात असतानाचा एक व्हिडीओ आला. मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की, यावर कडक पावलं उचलावी लागतील. याचा संदेश संपूर्ण समाजभर जाण्याची गरज आहे. हे लपून छपून करण्यासारखं नाही. ज्याप्रकारे ही लोक वागत आहेत त्यांना काय प्रकारची शिक्षा मिळत आहे हे सर्वांना कळणं गरजेचं आहे,” असं राज ठाकरेंनी सांगितलं.

“लॉकडाउनची शिस्त पाळा, अन्यथा अर्थसंकट निर्माण होईल”
“हा जो लॉकडाउन आहे गांभीर्याने घ्यावा. लोकांना रेशन, भाजीचे असे अनेक प्रश्न पडले आहेत. अनेक ठिकाणी सरकार उपलब्ध करुन देत आहे. पण मला भीती एका गोष्टीची आहे ती म्हणजे जर लॉक़डाउन वाढवला तर त्याचे गंभीर परिणाम होतील. सरकारकडे कोणताही कर येणार नाही. उद्योगधंद्यावर परिणाम होतील. आधीच ५० टक्क्यांवर पगार आणले आहेत. जितके दिवस वाढवू तसा परिणाम होत जाणार. शिस्त पाळली जाणार नाही तर अर्थसंकट निर्माण होईल. मोदी यावर काहीतरी बोलतील अशी अपेक्षा होती,” असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “जे लॉकडाउन पाळत आहेत त्यांच्या मनात भीती आहे. नोकरी राहणार का ? उद्या भाजीपाला मिळणार का ? असे प्रश्न त्यांना सतावत आहेत. जे शिस्त पाळत नाही आहेत त्यांच्यामुळे हे घडत आहे. व्हॉट्सअप, चॅनेलवर ज्या बातम्या येत आहेत ते पाहूनच धक्का बसतो. आजकाल प्रत्येक घरी एक डॉक्टर झाला आहे. कोणी म्हणतं गोमूत्र प्या, लसूण खा, कांदा खा….डॉक्टर काय उगाच मेहनत करत नाही आहेत. जीव धोक्यात घालून ते काम करत आहेत”.

आणखी वाचा- निवडणुकीच्या वेळी येणारे मुल्ला मौलवी आता कुठे?; राज ठाकरेंचा संतप्त सवाल

मोदींवर टीका
“सर्व डॉक्टर, शेतकरी, पोलीस, वीज-पाणी पुरवठा करणारे कर्मचारी सगळे आपला जीव धोक्या घालून काम करत आहे. पण लोकांना त्याचं गांभीर्य कळत नाही आहे. याकडे लक्ष दिलं पाहिजे. मी त्या दिवशी पंतप्रधानांचं भाषण ऐकलं. आता खरं तर वैद्यकीय यंत्रणा कशा पद्धतीने राबवली जात आहे. मृतांचा नेमकी संख्या काय आहे ? खरंच किती रुग्ण आहेत ? याबाबत संभ्रमावस्था आहे. ती दूर करण्याची जबाबदारी त्या पदावर बसलेल्या व्यक्तीची असते. त्यांनी ती संपवायची असते,” असं राज ठाकरेंनी म्हटलं.

“पंतप्रधानांनी दिवे लावण्यास सांगितलं आहे. लोक काळोख करतीलही, नाही तरी घरात बसून काय करायचं आहे. श्रद्धा किंवा अंधश्रद्धेचा विषय असेल, पण त्याच्याने काही होणार असेल तर त्याने परिणाम होऊ देत. पण नुसतं दिवे घालवून, मेणबत्त्या पेटवून, टॉर्च लावून याऐवजी पंतप्रधानांच्या भाषणात आशेचा किरण जरी दिसला असता तरी लोकांना समाधान वाटलं असतं. देश म्हणून आपण कुठे चाललो आहेत, पुढे काय घडणार आहे लोकांना कळलं असतं.उद्योगधंद्यांना काही दिलासा दिला नाही. तर उद्या नोकऱ्यांवर परिणाम होईल,” असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा- दिवे लावण्यापेक्षा पंतप्रधानांनी आशेचा किरण दाखवायला हवा होता – राज ठाकरे

“मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे”
“मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. यांच्यासाठी वेगळा विभाग उभा करावा आणि त्यांचे वैद्यकीय उपाचर बंद करायला हवे. यांना या दिवसांमध्येही देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल आणि आम्ही देश संपवू असं कारस्थान करायचं असेल…नोटांना थुंका लावत आहेत…भाज्यांवर थुंकत आहेत. नर्सेसमोर नग्न फिरत आहेत. या लोकांना  फोडून काढतानाचे व्हिडीओ व्हायरल हवेत तर लोकांना विश्वास बसेल. याबद्दल पंतप्रधानांनी बोलायला पाहिजे,” असं राज ठाकरेंनी सांगितलं. तसंच धर्म वैगेरे गोष्टी बोलायची ही वेळ नाही. पण मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचलं पाहिजे. लॉकडाउन आत्ता आहे, नंतर आम्ही आहोतच असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे – राज ठाकरे

“१४ तारखेला सर्व सुरळीत होईल असं मला वाटत नाही”
“जर अशा प्रकारे लोक वागत राहिले आणि करोनाचे रुग्ण वाढत राहिले तर लॉकडाउन वाढवावाच लागेल. १४ तारखेला सर्व सुरळीत होईल असं मला वाटत नाही. सगळे घऱात थांबले तरच वैद्यकीय कर्मचारी, महापालिका कर्मचाऱ्यांना माहिती मिळण्यात मदत होईल. ते काय जेलमध्ये टाकणार नाही आहेत. इतरांना त्रास होऊ नये यासाठी लोकांनी पुढे यायला पाहिजे. यामध्ये लपवण्यासारखं काही नाही. मला वाटतं समाजावर सर्वात मोठी जबाबदारी आहे. नुसतं सुशिक्षित असून चालत नाही, सुज्ञ पण असावं लागतं,” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- Coronavirus: समाजाची जबाबदारी मोठी, नुसता यंत्रणांना दोष नको – राज ठाकरे

उद्धव ठाकरेंना सल्ला
भाजी मार्केटमध्ये होणाऱ्या गर्दीवर बोलताना राज ठाकरे यांनी त्याची योग्य व्यवस्था केली पाहिजे असं म्हटलं. “मला सरकारवर टीका करायची नाही. आता ती योग्य वेळ नाही. परंतु ती यंत्रणा सरकारने लावायला हवी. सरकारने तशी व्यवस्था केली पाहिजे. प्रत्येक विभागवार यंत्रणा राबवली पाहिजे. सरकार करत नाही अशातला भाग नाही, पण ती नीट केली पाहिजे,” असं राज ठाकरेंनी सांगितलं.

हात जोडून विनंती
“माझी सर्वांना हात जोडून हे सगळं गांभीर्याने घ्या अशी विनंती आहे. हा लॉकडाउन पाळला नाही आणि प्रकरण वाढत गेलं तर दिवस वाढतील. दिवस वाढले तर यंत्रणेवर ताण येईल. यंत्रणेवर ताण आला तर सरकारवर येईल. कर मिळणार नाही. याचा परिणाम उद्योगधंद्यांवर होणार, नोकऱ्या जाणार. काय करायचं हे लोकांना कळणार नाही. हे सगळं आपल्या एका चुकीमुळे होणार आहे. अनेकांना वाटतं काय फरक पडणार आहे. या देशात अनेक माणसं आजपर्यंत मरतच आहेत. टीबीने वैगेरे लोक मरतात अशी उदाहरणं देतात. पण त्या बाकीच्या रोगांवर औषधं तरी आली. यावर अद्याप आलेलं नाही. आपल्याकडे व्हेटिलेटर्स नाहीत तेवढे,” असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns president raj thackeray mumbai police maharashtra lockdown sgy