परिवहन विभागातील दलालांना रोखण्यात यावे तसेच क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करावी, या मागण्यांसाठी मनसेच्या वाहतूक विभागाकडून काढण्यात आलेल्या मोर्चामुळे गुरुवारी दुपारी पूर्व आणि पश्चिम महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने असहाय्य झालेल्या हजारो मुंबईकरांनी या मोर्चाला उघडपणे शिव्याशाप दिले.
परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणाऱ्यांचे फावले असून या गैरप्रकारांना आळा घालण्यात यावा. मेरू, टॅबकॅब आदी फ्लीट टॅक्सींच्या कॉल सेंटरमध्ये मराठी भाषेचा वापर करण्यात यावा या मागण्यांसाठी मनसेच्या वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी शेख यांच्या नेतृत्वाखाली वांद्रे येथील परिवहन कार्यालयावर मोर्चा  काढण्यात आला. दुपारी कुर्ला येथील वाहतूक सेनेच्या कार्यालयापासून हा मोर्चा सुरू झाला आणि कलानगरमार्गे खेरवाडी जंक्शनवरून परिवहन मुख्यालयावर तो पोहोचला. या मोर्चामध्ये रिक्षा-टॅक्सी तसेच मोठय़ा बसेसमधून चार ते पाच हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते. या कार्यकर्त्यांनी वांद्रे जंक्शन येथे एक ट्रॉलर आडवा टाकून वाहतूक रोखली. त्याचप्रमाणे मोठय़ा प्रमाणात घोषणाबाजी करणाऱ्यांनी तेथे काही गाडय़ांची मोडतोडही केली. जमाव हिंसक होत असल्याचे पाहून पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. यात काही जण जखमी झाल्याचे वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी सांगितले. खेरवाडी जंक्शन आणि वांद्रे जंक्शन येथे झालेल्या कोंडीमुळे पूर्व आणि पश्चिम महामार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास खोळंबली होती. पश्चिम महामार्गावर अंधेरीपर्यंत तर पूर्व महामार्गावर सायन ते घाटकोपपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. बाहेरगावच्या गाडय़ा पकडणाऱ्या तसेच विमाने पकडणाऱ्या प्रवाशांची यामुळे चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांना आपला प्रवास रद्द करावा लागल्याचे सांगण्यात येते. हाजी शेख यांच्यासह १७ जणांना खेरवाडी पोलिसांनी अटक करून सायंकाळी उशीरा वैयक्तिक   जामीनावर सोडून दिले.

Story img Loader