मुंबई: मुलुंड परिसरात असलेल्या पालिकेच्या एम टी अग्रवाल रुग्णालयाचे खाजगीकरण केले जात असल्याचा आरोप मनसेने केला असून त्याविरोधात सोमवारी रुग्णालयाबाहेर जोरदार आंदोलन करून स्वाक्षरी मोहीम राबवली. पूर्व उपनगरतील महत्वाच्या रुग्णालयापैकी एक असलेल्या मुलुंडमधील या एम टी अग्रवाल रुग्णालयात मुलुंडसह ठाणे, कळवा, भांडुप, विक्रोळी, नाहूर आणि कांजूरमार्ग आदी परिसरातील शेकडो रुग्ण रोज उपचारासाठी येतात.

मात्र गेल्या काही वर्षांपासून या रुग्णालयात विविध समस्यांना रुग्णांना सामोरे जावे लागते. दोन वर्षांपूर्वी अतिदक्षता विभागात डॉक्टर उपलब्ध नसल्याने काही रुग्णांचा तेथे मृत्यू झाला होता. त्यानंतरही अनेक समस्या तेथील रुग्णांना भेडसावत आहेत. त्यातच सध्या रुग्णालयातील सर्वच विभागांचे खासगीकरण सुरू असल्याचा आरोप मनसेने केले आहे.

या रुग्णालयाचे खासगीकरण झाल्यास तेथे उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे रुग्णालयाचे खासगीकरण तातडीने थांबवावे अशी मागणी मनसेने केली आहे. त्यासाठी सोमवारी मनसेचे विभाग अध्यक्ष राजेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. तसेच स्वाक्षरी मोहीमही राबवण्यात आली. मात्र तरीही पालिकेने खासगीकरणाचा घाट सुरूच ठेवल्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटून यावर तोडगा काढण्याची मागणी करणार असल्याची महिती चव्हाण यांनी दिली.