सिंचन घोटाळे उघडकीस आणण्याची कामगिरी भाजप नेत्यांनी केली असून, विधिमंडळ आणि न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याने चौकशा सुरू आहेत. त्यामुळे भाजप नेते गप्प का आहेत, असा सवाल उपस्थित करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या चार वर्षांत वर्तमानपत्रे वाचली नसावीत, अशी बोचरी टीका भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केली.
भाजप नेत्यांनी विधिमंडळात सिंचन घोटाळे उघड केले, तेव्हा मनसे आमदारांनी काहीच केले नाही, असे भंडारी यांनी सांगितले. ठाकरे यांनी जालना येथे बोलण्याआधीही त्यांनी स्थानिक नेत्यांकडून माहिती घ्यायला हवी होती. जालन्यातील प्रकल्पामध्ये झालेल्या सुमारे २७०० कोटी रुपयांचा घोटाळा भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी उघडकीस आणला असून त्यांच्या याचिकेमुळेच जलसंपदा विभागाच्या सचिवांपासून उच्चपदस्थांविरुध्द एफआयआर नोंदविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. भाजप खासदार अजय संचेती व आमदार संदीप बाजोरिया यांना सिंचन प्रकल्पांची नियमबाह्य़ पध्दतीने कंत्राटे दिली असतील, तर सरकारने चौकशी करुन जरुर कारवाई करावी, असेही ते म्हणाले.