मनसे आणि अॅमेझॉनमधील वाद आता चिघळण्याची शक्यता आहे. मनसेने सुरु केलेल्या मराठी भाषेच्या मोहिमेविरोधात अॅमेझॉनने कोर्टात धाव घेतली आहे. यानंतर दिंडोशी कोर्टाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. कोर्टाने राज ठाकरे आणि काही मनसे सचिवांना ५ जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान मनसेने आपण मराठीच्या भूमिकेवर ठाम राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच अॅमेझॉनला मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा दिला आहे.
राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यानंतर मनसे नेते अखिल चित्रे यांनी एबीपी माझावर प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, “मनसे आपल्या भूमिकेवर ठाम आहे. अॅमेझॉनला महाराष्ट्रात व्यवसाय करु देत आहे हे विसरता कामा नये. अॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार हे नक्की आहे”.
आणखी वाचा- “राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या अॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार”
पुढे ते म्हणाले की, “खटले दाखल करण्याचा प्रयोग त्यांनी सुरु केला आहे. १९ तारखेला माझ्याविरोधात केस टाकली होती. आता राज ठाकरेंना नोटीस पाठवण्याचं दु:साहस त्यांनी केलं आहे. याची किंमत त्यांना मोजावी लागणार आहे. अशा फालतू नोटीसला आम्ही फार किंमत देत नाही. मराठीसाठी कोणत्याही केसेस अंगावर घेण्याची तयार आहोत हे अॅमेझॉनने लक्षात ठेवावं”.
Final request with folded hands,hope you go through the facts put down in the letter and take necessary corrective steps accordingly to incorporate’Marathi’in the app option list at the earliest.@mnsadhikrut @JeffBezos @AmitAgarwal @GopalPillai @RahulSundaram6 @amazon @amazonIN pic.twitter.com/JVQiB8xqF4
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) December 23, 2020
काय आहे नेमका वाद –
अॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मनसेने मोहीम सुरु केली होती. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी सात दिवसांत मराठी भाषेत अॅप सुरू करावं, अन्यथा दिवाळी मनसे स्टाईलने होईल असा इशा मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिला होता. यासाठी त्यांनी कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन भेटही दिली होती. याशिवाय ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ असा मजकूर लिहिलेले बॅनर वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी परिसरात लावण्यात आले होते.
अमेझॉन व फ्लिकार्ट ह्या बॅंगलुरु स्थित मजोर कंपन्यांची दक्षिणी भाषांना प्राधान्य देत महाराष्ट्रात मराठी भाषेला डावलले आहे.
तरी,आज @Flipkart @amazonIN ह्या मजोर कंपनी व्यवस्थापनाला त्यांच्या मुख्य कार्यालयात जाऊन @mnsadhikrut दणका दिला. pic.twitter.com/YaFvhJsc2x
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) October 15, 2020
विशेष म्हणजे मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या मागणीची अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी दखल घेतली होती. जेफ बेझॉस यांना तुमचा ईमेल मिळाला आहे. अॅमेझॉन अॅपबाबत तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित टीमला आम्ही याची माहिती दिल्याचा ई-मेल अॅमेझॉनकडून पाठवण्यात आला होता. त्यानंतर अॅमेझॉनचं शिष्टमंडळ मुंबईत आलं होतं.