मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मला हिंदूह्रदयसम्राट म्हणू नका अशी सूचना पदाधिकाऱ्यांना केली आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. रंगशारदा येथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला राज ठाकरे मार्गदर्शन करणार होते. मात्र राज ठाकरे १० मिनिटांतच बैठकीतून निघून गेल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान राज ठाकरे यांची तब्येत ठीक नसल्याने ते बैठकीतून निघून गेल्याचं सांगण्यात येत आहे.
मनसेतर्फ ९ फेब्रुवारीला सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ मोर्चाची दिशा ठरवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शॅडो कॅबिनेट, सीएए मुद्द्यांवर चर्चा होणार होती. राज ठाकरे बैठकीसाठी हजर राहिले होते. यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आपल्याला हिंदूह्रदयसम्राट संबोधू नका अशा सूचना केल्या. पक्षाचं पहिलं महाअधिवेशन पार पडल्यानंतर अनेकांनी राज ठाकरे यांचा हिंदूह्रदयसम्राट असा उल्लेख केला होता. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी ही सूचना केली. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदूह्रदयसम्राट असा उल्लेख केला जातो.
येत्या ९ फेब्रुवारी २०२० ला महाराष्ट्र नवनिर्माण सेना बांग्लादेशी-पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मुंबईत मोर्चा काढणार! https://t.co/WOIY5vGLUu#मनसे_अधिवेशन #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रसैनिक #RajThackeray
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) January 25, 2020
राज ठाकरे बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा होती. पण १० मिनिटांतच राज ठाकरे बैठकीतून निघून गेले. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, थ्रोट इन्फेक्शन झालं असल्याने तसंच डॉक्टरांकडे जायचं असल्याने राज ठाकरे लवकर बैठकीतून निघून गेले. जाण्याआधी त्यांनी पक्षाच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना केल्या. तसंच ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभुमीवर सर्व तयारी करण्याचा आदेश दिला आहे.