राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (२ मे) अचानक पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आणि अनेकांना धक्का बसला. पवारांच्या या निर्णयाचे राजकीय वर्तुळात अनेक अर्थ काढले जाऊ लागले आणि तर्कवितर्कांना उधाण आलं. कुणी या निर्णयाला दबावातून उचललेलं पाऊल म्हटलं, तर कुणी हा निर्णय म्हणजे मास्टरस्ट्रोक असल्याचं म्हटलं. याच पार्श्वभूमीवर आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया देत शरद पवारांचा राजीनाम्याचा निर्णय मास्टर स्ट्रोक असल्याचं म्हटलं.
राजू पाटील म्हणाले, “शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. एक व्यक्ती, एक माणूस म्हणून बोलायचं झालं तर त्यांचं वय व आजार याचा विचार करून हा निर्णय घेतला असावा. राज ठाकरे मागे मुलाखतीत म्हणाले होते की, शरद पवार कामात वाघ आहेत. मात्र, कुठेतरी थांबायला हवं आणि म्हणून ते थांबले असावेत.”
“सुरू असलेल्या हालचाली थांबाव्यात यासाठीचा मास्टर स्ट्रोक”
“ते शरद पवार आहेत आणि त्यांच्यावर भाष्य करण्याएवढा मी मोठा नाही. परंतू, एकंदरीत ज्या हालचाली चालल्या होत्या, जे ऐकायला येत होतं, त्या अफवा असतील कदाचित, त्या कुठेतरी थांबाव्यात यासाठी त्यांनी मास्टर स्ट्रोक खेळला असेल,” असं मत राजू पाटील यांनी व्यक्त केलं.
व्हिडीओ पाहा :
“ते शरद पवार आहेत त्याच्याबद्दल काय बोलणार”
“राजकारणी म्हणून हा निर्णय शरद पवार यांचा मास्टर स्ट्रोक आहे. तो अनेक अंगानी असू शकतो. ते शरद पवार आहेत त्याच्याबद्दल काय बोलणार,” असंही राजू पाटील यांनी नमूद केलं.