मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी शिवाजी पार्कजवळ काही अज्ञात व्यक्तींनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर देशपांडे यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. या हल्ल्याचे पडसाद सध्या राजकीय वर्तुळात उमटत असून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी याप्रकरणी संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमवीर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी आधी खोचक सवाल करत नंतर हल्ल्याचा निषेध केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं?

संदीप देशपांडे आज सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी शिवाजी पार्क परिसरात गेलेत असता तिथल्या एका टोळक्यानं त्यांच्यावर हल्ला केला. स्टम्पच्या सहाय्याने ही मारहाण करण्यात आली असून यात संदीप देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. यानंतर त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरेही त्यांची भेट घेण्यासाठी हिंदुजा रुग्णालयात गेले होते. उपचारांनंतर संदीप देशपांडेना घरी सोडण्यात आलं.

संदीप देशपांडेंची सूचक प्रतिक्रिया

या हल्ल्यावर खुद्द संदीप देशपांडेंनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही कुणालाही घाबरत नाही, घाबरणार नाही. असा घाबरवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. आम्ही कुणालाही भीक घालत नाही. यामध्ये कोण लोक आहेत हे सर्वांना माहिती आहे”, असं संदीप देशपांडे म्हणाले.

दरम्यान, यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या हल्ल्याप्रकरणी संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंची चौकशी करण्याची मागणी अमेय खोपकर यांनी केली आहे. “माझी मुंबई पोलिसांना विनंती आहे की महाराष्ट्रातले चिंधीचोर गुंड आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावं आणि त्यांची चौकशी करावी. संदीप देशपांडे सातत्याने या लोकांच्या विरोधात मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांची चौकशी करावी आणि त्यात तथ्य आढळलं तर त्यांना अटक करावी”, असं अमेय खोपकर म्हणाले.

या हल्ल्यामागे कोण आहे? मनसे नेते संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “यामध्ये…”

“..म्हणून अशा हल्लेखोरांना बळ मिळतं”

दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी माध्यमांनी संजय राऊतांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी आधी खोचक प्रश्न केला आणि त्यानंतर या हल्ल्याचा निषेध केला. “संदीप देशपांडे कोण आहेत? कुठे असतात ते? म्हणजे हा हल्ला नेमका कुठे झाला? कोणत्याही नागरिकावर अशा प्रकारे हल्ले होणं चांगल्या कायदा-सुव्यवस्थेचं लक्षण नाही. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी सनसनाटी निर्माण करण्यासाठी हे चाललंय असं म्हटल्यामुळे अशा हल्लेखोरांना बळ मिळतं”, असं संजय राऊत म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns sandeep deshpande attacked sanjay raut mocks cm eknath shinde pmw