मुंबईत सर्व गणेशभक्तांनी भक्तीभावाने दहाव्या दिवशी लाडक्या बाप्पाला निरोप दिला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत चाललेल्या विसर्जन मिरवणुकांमध्ये मुंबईकरांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. मात्र, यावेळी प्रभादेवीमध्ये एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेचा गट यांच्यामध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं. हे प्रकरण आता वेगळ्या वळणावर गेलं असून सदा सरवणकरांनी शनिवारी गोळीबार केल्याचा आरोप सुनील शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून मुंबईतलं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीपासूनच शिंदे गट आणि शिवसेना यांच्यामधील वितुष्ट दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. त्याचाच परिणाम गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दिसून आला. दहाव्या दिवशी मिरवणुकीदरम्यान प्रभादेवीमध्ये शिंदे गट आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. दोन्ही बाजूंनी बाचाबाची झाली. त्यात सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी ‘म्याँव म्याँव’ म्हणत शिवसेनेवर टीका करणारं भाषण केल्यानंतर वातावरण अधिकच तापलं होतं. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद अधिक न चिघळता मिटला.
मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी रात्री पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला. या दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकजा वाद निर्माण झाला असून या वादात आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी केला आहे. मात्र, हा कौटुंबिक वाद होता, असं म्हणत सदा सरवणकर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, गोळीबाराचे आरोप देखील फेटाळून लावले आहेत.
“हाणामाऱ्या करायला हा काही बिहार नाही”
दरम्यान, या सगळ्या प्रकरणावरून आता मनसेनं शिवसेनेला टोला लगावला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टीव्ही ९ शी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. “दादर, माहीम, प्रभादेवी हे एक सुसंस्कृत मतदारसंघ आहेत. अशा प्रकारच्या हाणामाऱ्या करायला हे काही बिहार राज्य नाही. पोलिसांनी योग्य ती चौकशी करावी आणि जे दोषी असतील, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी”, असं ते म्हणाले.
“त्या महिला कॉन्स्टेबल आता कुठे आहेत?”
“शिवसेनेनं जे अडीच वर्षांत पेरलंय, ते आता उगवतंय. तुम्ही अडीच वर्षांत लोकांवर खोट्या केसेस टाकल्या, त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर आणि संतोष धुरीवर खोटी केस टाकली की महिला कॉन्स्टेबलला धक्का दिला म्हणून. ती महिला कॉन्स्टेबल आता आहे कुठे? त्यांचं स्टेटमेंट नाही, काही नाही. गेल्या अडीच वर्षांत अशा अनेक खोट्या केसेस तुम्ही लोकांवर टाकल्या. त्यामुळे जे पेरलंय, ते उगवतंय”, अशा शब्दांत संदीप देशपांडेंनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.