पुण्यातील कल्याणीनगरमधील हिट अँड रन अपघाताचे प्रकरण ताजे असतानाच आत वरळीतील ॲट्रिया मॉलजवळ रविवारी पहाटे भीषण अपघात घडला. एका BMW वाहनानं दुचाकीवर मासळी घेऊन चालेल्या नाखवा दाम्पत्याला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील पती बाजूला फेकला गेला आणि वाहनाने महिलेला १०० मीटरपर्यंत फरफटत नेलं. या दुर्दैवी अपघातात सदर महिलेचा मृत्यू झाला. या अपघातानंतर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “अत्यंत घृणास्पद असा हा गुन्हा आहे. वाहन चालकाने जर वेळीच ब्रेक मारला होता आणि तो तिथेच थांबला असता तर आमच्या नाखवा वहिनी आज जिवंत असत्या”, अशी प्रतिक्रिया देशपांडे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संदीप देशपांडे यांनी या अपघाताविषयी माध्यमांना माहिती दिली. अपघातानंतर जखमी नाखवा यांच्याशी फोनवर बोललो असल्याचे त्यांनी सांगितले. नाखवा यांनी देशपांडेंना दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर ते स्वतः वाहनाच्या बोनेटवर पडले. त्यांच्या अंगावर त्यांच्या पत्नी पडल्या. बीएमडब्लू वाहन चालकान जेव्हा ब्रेक मारला तेव्हा ते दोघेही खाली पडले. नाखवा गाडीच्या बाजूला पडले तर त्यांच्या पत्नी गाडीच्या चाकासमोरच पडल्या.

वरळीत भरधाव BMW वाहनाची दुचाकीला धडक, महिलेला १०० मीटरपर्यंत फरफटत नेल्यानंतर मृत्यू

“बीएमडब्लू वाहन चालकाने जर ब्रेक मारल्यानंतर गाडी चालू केली नसती तर नाखवा वहिनी आज जिवंत असत्या. वाहन चालकाने पळून जाण्याच्या नादाता त्यांना १०० मीटरपर्यंत फरफटत नेलं. त्यामुळे वाहन चालकावर कलम ३०२ चा गुन्हा दाखल झाला पाहीजे. जो कुणी आरोपी असेल त्यावर कडक कारवाई करावी”, अशी मागणी केली असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले.

संदीप देशपांडे पुढे म्हणाले की, आरोपीचे कुठलेही राजकीय संबंध असले तरी त्यांना सोडता कामा नये. अशा गुन्हेगारांचे राजकीय संबंध असले तरी आम्ही त्यांना सोडू देणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई होण्यासाठी पाठपुरावा करत राहू.

अपघात कसा घडला?

वरळीतील ॲट्रिया मॉलजवळ पहाटे ५.३० वाजता अपघात घडला. मॉलजवळच असलेल्या वरळी कोळीवाड्यात नाखवा दाम्पत्य राहत असून ते सकाळी ससून डॉक येथे मासे विकत घेण्यासाठी गेले होते. मासे घेऊन घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या बीएमडब्लू वाहनाने धडक दिली. दुचाकीवर मासळी असल्यामुळे दुचाकी चालवत असलेल्या नाखवा यांचे दुचाकीवर नियंत्रण सुटले. त्यामुळे पती-पत्नी वाहनाच्या बोनेटवर धडकले. वाहनाने ब्रेक मारल्यानंतर नाखवा बाजूला पडले. मात्र त्यांच्या पत्नीला वेळीच बाजूला होता आले नाही. त्यातच बीएमडब्लूच्या चालकाने वाहन पळविल्यामुळे त्या वाहनाबरोबर १०० मीटरपर्यंत फरफटत गेल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns sandeep deshpande reacts bmw hit and run accident in the worli fisherman women dies kvg
Show comments