वरळीतल्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जाणार आहे. परंतु पुनर्विकास करत असताना रहिवाशांना ३ वर्षांपेक्षा जास्त काळ संक्रमण शिबीरात किंवा बाहेर भाड्याने घर घेऊन राहावं लागेल अशी भिती व्यक्त केली जात होती. याबाबत अलिकडेच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी येथील रहिवाशांची बैठक घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले होते. तसेच या पुनर्विकासावर अनेक सवाल उपस्थित केले होते. यानंतर आता स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनी एक निवदेन जारी केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, केवळ ३ वर्षामध्ये नागरिकांना घरं मिळतील.
आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे की, नवीन नियोजनानुसार नागरीकांना केवळ ३ वर्षामध्ये डोळ्यादेखत नवीन घर मिळणार आहे. त्याचप्रमाणे कमीत कमी रहिवाशांनांच संक्रमण शिबीर अथवा बाहेर २५,००० रुपये मासिक भाडे घेऊन राहावे लागणार आहे. या काळात २५,००० रुपये मासिक घरभाडे देण्याची जबाबदारी म्हाडाची असेल. तर बाकीच्या रहिवाशांना बाहेर राहण्याची गरज नसून थेट नवीन घरामध्ये जाता येणार आहे.
म्हाडा सामूहिक सादरीकरण करणार
“वरळी बी. डी. डी. पुनर्विकास आराखडा रहिवाशांना याविषयीची कोणतीही माहिती हवी असल्यास ती म्हाडा कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच रहिवसांना आवश्यक वाटल्यास सामूहिक सादरीकरण म्हाडाच्या वतीने करण्यात येईल. त्याचप्रमाणे इतर कोणत्याही शंका असल्यास त्यासाठी म्हाडा स्वतः सामूहिक बैठकांचे आयोजन करून आपल्या शंकेचे निरसन करेल आणि यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत.”
हे ही वाचा >> “विरोधकांना एकत्र आणण्याची सुरुवात झाली”, राहुल गांधींबरोबरच्या बैठकीनंतर शरद पवारांचं विधान
निवेदनात म्हटलं आहे की, सर्व रहिवासी या पुनर्विकास प्रकल्पाची वाट पाहत आहेत, परंतु यामध्ये स्वतःची घरं भरू इच्छिणारे काही समाजकंटक आडकाठी आणत आहेत. खंत हीच वाटते की, हा प्रकल्प अपूर्ण राहिला तर हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सामान्य मराठी माणसांचे मुंबईमधील घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही आणि याचे पूर्ण पाप त्याच समाजकंटकांवर असेल.