मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वावरुन भाजपा नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. हिंदुत्व सोडल्याची गेले काही दिवस माझ्यावर टीका होत आहे. हिंदुत्व म्हणजे धोतर आहे का, घालावे आणि मग सोडावे अशी विचारणा त्यांनी भाजपा नेत्यांना केली आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी यावेळी सगळ्यांचा एकादा परामार्श सोक्षमोक्ष लावून टाकायचा आहे, हे तकलादू हिंदुत्ववादी आलेले आहेत, त्यांचा समाचार घ्यावा लागणार आहे असं सांगत जाहीर सभा घेणार असल्याचं सांगितलं आहे. उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वावरुन केलेल्या या विधानावर मनसेने टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी आणि तिकीट, पास काढताना रोख रक्कमेचा व्यवहार टाळता यावा यासाठी ‘एकच सामायिक कार्ड’ (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) सुविधेचे लोकार्पण सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपासहित राणा दांपत्य आणि राज ठाकरेंवर निशाणा साधला.

“बिनकामाचे भोंगे….,”, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले “मी काडीची किंमत देत नाही”

“जे आता आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत त्यांनी हिंदुत्वासाठी काय केलं आहे? बाबरी पाडली तेव्हा तुम्ही बिळात लपला होतात. राममंदिर बांधण्याचा निर्णयदेखील तुमच्या सरकारने घेतलेला नाही तर कोर्टाने दिला आहे. मंदिर बांधतानाही तुम्ही झोळ्या पसरल्या आहेत, मग तुमचं हिंदुत्व कुठे आहे?,” अशी विचारणा यावेळी उद्धव ठाकरेंनी केली.

“हे कुठले आले घंटाधारी हिंदुत्ववादी ? घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी गदाधारी हिंदुत्ववाल्यांना शिकवू नये. आमचे हिंदुत्व हे हनुमानाच्या गदेसारखे आहे, आमच्या घरी यायचे आहे तर या…पण दादागिरी करुन याल तर दादागिरी कशी मोडायची हे शिवसेनाप्रमुखांनी हिदुंत्वाच्या व्याख्येत सांगितल आहे,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

राणा दांपत्याने दिलेल्या आव्हानानंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले “दादागिरी कशी मोडून काढायची…”

उद्धव ठाकरे यांनी यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला. “ज्यांच्या पोटात अॅसिडीटी झाली आहे, आगडोंब उसळला आहे, जळजळतंय, मळमळतंय काही कळत नाही. पण त्यांनी त्यांच्या राज्यातल्या किती राजधान्यांमध्ये, शहरांमध्ये मुंबईच्या शाळेचा दर्जा अंगीकारुन दाखवला आहे हे दाखवावं असं माझं आव्हान आहे. काम काहीच नाही आणि बिनकामाचे भोंगे वाजवायचे हाच त्यांचा उद्योग असून मी काडीची किंमत देत नाही,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंवर निशाणा साधला.

दरम्यान संदीप देशपांडे यांनी आणखी ट्वीटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. “अजानची स्पर्धा भरवणारे, हनुमान चालिसाला विरोध करणारे नव पुरोगामीच आणि नव पुरोगाम्यांना आपण हिंदू आहोत याची जाणीव करून देणारे राजसाहेबच. आता कितीही हिंदू हिंदू म्हणून ओरडलात तरी “बुंदसे गयी वो हौद से नहीं आती”,” असा टोला संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

लवकरच जाहीर सभा

“लवकरच मी एक जाहीर सभा घेणार आहे. हल्ली सभेचं पेव आहे. सगळ्यांचा सोक्षमोक्ष मला लावायचा आहे. जे नकली व तकलादू हिंदूत्ववादी आले आहेत, मला त्यांचा समाचार घ्यायचा आहे आणि तो लवकरच घेणार,” असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns sandeep deshpande tweet on maharashtra cm uddhav thackeray over hindutva sgy