उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या केलेल्या वक्तव्याविरोधात शिवसेना व मनसेने बुधवारी राज्यात जागोजागी अजित पवार यांच्या पुतळ्यांचे दहन करून रास्तारोको केले. या साऱ्यात मनसेने दादर येथे एका शाळकरी मुलाला अजित पवार यांच्या फोटोवर लघुशंका करायला लावून आपलीही पातळी अजित पवारांपेक्षा कमी नसल्याचे दाखवून दिले.  
पवार यांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ मनसेने केलेल्या रास्तारोको आंदोलनामुळे सकाळी वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला.  शिवसेना भवनासमोरील रस्त्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा पुतळा जाळला. त्यानंतर मनसेच्या एका महिला गटप्रमुखाच्या मुलाला बोलावून अजितदादांच्या छायाचित्रावर लघुशंका करायला लावल्यामुळे दादरमधील नागरिकांमध्ये मनसेच्या या कृतीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त होत होती.
आमदार बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली लालबाग येथे अजितदादांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. दरम्यान, पिंपरी-चिंवड येथे अनेक ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांना अजित पवार यांचे नाव देण्याचा धडाका भाजपने लावल्याने या आंदोलनाविरोधात नेमकी काय प्रतिक्रिया द्यायची या संभ्रमात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत.
‘राज’कीय नौटंकी
अजित पवार यांच्या विरोधातील वातावरणाचा फायदा उकळण्यासाठी व आपल्या ‘राज’कीय पोळीवर तूप ओढून घेण्यासाठी आता मनसेने राज्यभर पवारविरोधी आंदोलन सुरू केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. ‘कलर्स’वाहिनीवर पाकिस्तानी कलाकार सहभागी झाल्याच्या मुद्दय़ावरून आधी आंदोलन जाहीर करून बोनी कपूर येऊन भेटताच आंदोलन मागे घेणाऱ्या राज ठाकरे यांचे अजितदादाविरोधी आंदोलन ही ‘राजकीय नौटंकी’ असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ आमदाराने केला.
अतिरेक्यांचा मुंबईवरील हल्ला, सीमेवरील पाकिस्तानच्या घातपाती कारवायांचा मुद्दा उपस्थित करून पाकिस्तानी कलावंत असलेला कलर्स वाहिनीचा कार्यक्रम बंद पाडण्याचे गाजावाजा करून राज ठाकरे यांनी जाहीर केले होते. याच मुद्दय़ावरून विख्यात गायिका आशा भोसले यांच्यावर जोरदार टीका करून पुण्यातील कार्यक्रमात आशा भोसले यांनी केलेली टीका सव्याज परत करण्याचे उद्योग राज यांनी केले. असा आरोप या आमदाराने केला. मुंबईतील रस्त्याच्या कंत्राटातही सुरुवातीला जोरदार आवाज करणारी मनसे नंतर गप्प का झाली, असा सवाल करून ‘टोलनाका’ आंदोलनासह विविध ‘अर्थपूर्ण’मुद्दय़ांवर आधी आंदोलन करायचे आणि नंतर गप्प बसायचे हेच उद्योग राज ठाकरे यांनी केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या आमदारांनी केला. जळगावच्या सभेत मराठी आया बहिणींना वेश्या व्यवसाय करायला लागत असल्याचे सांगून राज यांनी महिलांचा अपमान केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आज विधानसभेतच केला.
राष्ट्रवादीही ‘जशास तसे’ उत्तर देणार!
दरम्यान, लहान मुलाला मूत्रविसर्जन करण्यास लावणाऱ्या मनसेने माफी न मागितल्यास ‘जशास तसे’ उत्तर देऊ, असा इशारा मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार संजय दीना पाटील यांनी दिला.

Story img Loader