गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मनसेनं विशेष बस सेवा सुरु केली आहे. या बस सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. आजपासून (शनिवार) या बस सेवेला प्रारंभ झाला असून दादरमधून ही पहिली बस कोकणसाठी रवाना झाली. मनसे आणि महापालिका कामगार-कर्मचारी सेनेच्यावतीनं हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
“गणेशोत्सवानिमित्त लोकांना कोकणात सोडण्याची जबाबदारी खरंतरं राज्य सरकारची होती. त्यांनी ती योग्य पद्धतीनं पार न पाडल्यामुळं लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभम्र होता आणि नाराजी देखील होती. त्यामुळे मनसेनंच हा पुढाकार घेऊन उपक्रम राबवला आहे. शहरातील विविध भागांतून अशा बस कोकणासाठी सोडण्यात येणार आहेत,” अशी माहिती मनसे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी दिली.
“या प्रवासासाठी मनसेच्यावतीनं पॅसेंजर सेफ्टी कीट बनवण्यात आलं आहे. यामध्ये फेस मास्क, हँड ग्लोव्ह्ज, सॅनिटायझर, बेडशीट यांचा समावेश आहे. सुमारे अडीचशे बसेसपैकी आज २५ टक्के बसेस दिवसभरात विविध वेळांमध्ये सोडण्यात येणार आहेत. आज १० ते १५ बसेस दादरवरुन सुटणार आहेत. तर काही बसेस या ठाणे, भांडूप आणि इतर भागातून सोडण्यात येणार आहेत. पन्नास प्रवाशांची क्षमता असलेल्या बसमधून निम्म्याच प्रवाशांना जाता येणार आहे. चिपळून, महाडपासून कणकवली-सावंतवाडीपर्यंत या बसेस जाणार आहेत,” अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.