केवळ महापालिका निवडणुकाच नव्हे तर जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये शक्तिनिशी उतरण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे. एकीकडे निवडणुकीच्या रिंगणात ताकदीने उतरायचे, तर दुसरीकडे रस्त्यावरील मनसेचा दबदबा पुन्हा कायम करायचा, अशी रणनीती मनसेने आखली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ही भूमिका स्पष्ट करताना ‘रस्त्यावर आपलीच ताकद असेल’ असे सांगितल्याने आगामी निवडणुकांच्या काळात मनसेच्या आंदोलनांची धार तीव्र असेल असे मनसेच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर मनसे संपली असे राजकीय वर्तुळात मानले जात असतानाच राज ठाकरे यांनी राज्यातील नगरपालिका ते नगरपंचायतींपर्यंत सर्व निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व निवडणुका लढविल्याशिवाय ‘मी महाराष्ट्राचा व महाराष्ट्र माझा’ होणार कसा, या कार्यकर्त्यांच्या प्रश्नाला पक्षाच्या नेत्यांकडे उत्तरच नसल्यामुळे मनसेचे नेतेही ग्रामीण भागात जाण्याचे टाळत होते. ही कोंडी फोडण्यासाठी आणि मनसेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी राज्यातील २६ जिल्हा परिषदा, १४८ नगरपालिका तसेच सुमारे अडीचशे नगरपंचायत निवडणुका लढविण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे. यासाठी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर संघटनात्मक बांधणीचे जाळे भक्कम करण्याचे काम करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. राज्यातील सर्व निवडणुका लढविण्याचा निर्णय राज यांनी घेतल्याचे सांगून आता मनसेची ताकद दिसून येईल, असा विश्वास बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला. विरोधकांचे आवाज दाबण्यासाठी सरकार ‘अंतर्गत सुरक्षा कायद्याच्या’ नावाखाली पुन्हा मागच्या दाराने आणीबाणी लादू पाहात असल्याचे सांगून बाळा नांदगावकर म्हणाले, आमचे आमदार या वेळी निवडून आले नाहीत हे जरी खरे असले तरी रस्त्यावर आमचीच ताकद आहे हे राज ठाकरे यांचे म्हणणे आम्ही खरे करून दाखवू.