महाविद्यालयांमधील सचिव निवडणूक ही नामांकन पद्धतीने होत असली तरी त्यात राजकीय पक्ष आपले कसब आजमावतात. यंदा या निवडणुकीत युवा सेनेची पिछेहाटी झाली. युवा सेनेचा बालेकिल्ला असलेल्या कीर्ती आणि पाटकर महाविद्यालयांमध्ये त्यांना मोठा फटका बसला असून यंदा या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने बाजी मारली आहे.
युवा सेना तसेच मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी निवडणुकांसाठी महाविद्यालयांबाहेर गर्दी केली होती. या वर्षीच्या कीर्ती महाविद्यालयामध्ये अस्मिता रावले, रूपारेलमध्ये चैतन्य पवार, चेतनामध्ये अतुल चव्हाण, पाटकरमध्ये सूरज पाटील, सराफमध्ये नेहा शर्मा, विवेक महाविद्यालयात मयूर विश्वकर्मा, दालमिया महाविद्यालयात रेश्मा पाटील, मंडणगड महाविद्यालयात प्रसन्ना र्मचडे, संस्कारधाम महाविद्यालयात तृप्ती मयेकर, गोदाबाई परुळेकर महाविद्यालयात जिग्नेश मोर, साठय़े महाविद्यालयात श्याम साने या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. हे सर्व विद्यार्थी मनविसेच्या बाजूने असल्याचे मनविसेने पत्रकात म्हटले आहे. दरम्यान, युवा सेनेने यंदा चांगली मोर्चेबांधणी केली होती तरी त्यांना मुंबईत मोठय़ा पराभवाला सामोरे जावे लागले. आता मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकांकडे लक्ष्य असल्याचे सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी स्पष्ट केले.
‘मोदी युवा शक्ती’ चे प्रचारकार्य सुरू
भाजपने ‘मोदी युवा शक्ती’ अशा मोदींच्या नावाचा प्रचार करणारी युवकांची संघटना हाताशी धरून महाविद्यालयांमध्ये प्रचार सुरू केला आहे. मुंबईतील महाविद्यालयांमध्ये या संघटनेने आपले काम सुरू केले असून मोदींच्या सभेपर्यंत सुमारे २० हजार आणि त्यानंतर निवडणुकीपर्यंत ५० हजार महाविद्यालयीन तरुणांना सदस्य करून घेण्याचा संकल्प या संघटनेला साथ देणाऱ्या भाजप नेत्यांनी सोडला आहे. सोशल मीडीयामध्ये मोदींना पाठिंबा देणाऱ्या मुंबईतील काही महाविद्यालयीन तरूणांचा एक गट होता. त्यांनी ‘मोदी युवा शक्ती’ अशी संघटना स्थापन करून मोदींना पंतप्रधान बनविण्याचा संकल्प सोडला आणि सोशल मीडीयाच्या माध्यमातून कार्यकर्ते जमविण्यास सुरूवात केली. त्यानंतर भाजपने या गटाला ‘आधार’ दिला़