महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची पुनर्बांधणी करताना प्रत्येक महाविद्यालयात मनविसेची विद्यार्थी कार्यकारिणी (स्टुडंट्स युनिट) स्थापन करण्यावर मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी भर दिला आहे. गेल्या आठ दिवसांत अमित ठाकरे यांनी मुंबईतील १९ विधानसभा मतदार सुमारे ३,५०० हून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनींशी संवाद साधला असून ” तुमच्या महाविद्यालयात मनविसेचे युनिट स्थापन करण्यासाठी कामाला लागा” अशा सूचना त्यांनी मनविसेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मनसे पक्ष कार्यालयात व्यक्तिशः जाऊन अमित ठाकरे भेटी देत आहेत. मनविसेचे पदाधिकारी आणि मनविसेत नव्याने सामील होऊन काम करू इच्छिणाऱ्या महाविद्यालयीन तरुण तरुणींशी ते संवाद साधत आहेत. त्यांच्या शैक्षणिक अडचणी जाणून घेत आहेत. वाढीव फी, प्रवेश प्रक्रियेला गोंधळ, शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, व्यवस्थापन कोटा आदी अनेक विषयांवर विद्यार्थी त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलत आहेत.
अमित ठाकरे यांच्या या पुनर्बांधणी संपर्क अभियानामुळे फक्त मनविसेतच नव्हे तर संपूर्ण मनसेत उत्साहाचे वातावरण आहे. ते ज्या कुठल्या मतदारसंघात जातील तिथे मोठ्या संख्येने बॅनर्स, रस्त्याच्या दुतर्फा झेंडे आणि ढोल ताशा पथक यांनी त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत होत आहे. प्रत्येक ठिकाणी किमान २०० मुलं मुली त्यांना भेटत असून मनविसेत सक्रिय काम करण्यासाठी फॉर्म भरून तसंच वैयक्तिक भेटून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. ” विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचे विषय समजून घेऊन शैक्षणिक समस्या सोडविण्यावरच भर द्यावा ” अशा स्पष्ट सूचनाही अमित ठाकरे यांनी दिल्या आहेत.