मुंबई: राज्यातील बँकेमध्ये प्रादेशिक भाषेचा वापर करणे हे अनिवार्य असतानाही इथे मात्र काही बँकांमध्ये जाणूनबुजून मराठी भाषेला डावलले जात आहे. मात्र यापुढे सर्व बँकांना असोसिएशनमार्फत प्रादेशिक भाषा वापराबाबत योग्य ती समज द्यावी, अन्यथा मनसेकडून मराठी भाषेसंदर्भात प्रखर आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी ही बँकेची असेल, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी दिला.

राज्यातील बँकांमध्ये मराठी भाषेची सक्ती करण्यासाठी पुकारलेले आंदोलन मनसेने तूर्तास स्थगित केले असले तरी यासंदर्भात राज ठाकरे यांनी आता थेट आता इंडियन बँक असोसिएशनला पत्र पाठवून इशारा दिल्याने पुन्हा एकदा मराठीचा वाद चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बँकांमधील मराठी भाषाचा वापराबाबत राज ठाकरे यांनी जाहीर केलेल्या भूमिकेनंतर बुधवारी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, यशवंत किल्लेदार, चेतन पेडणकर यांच्या शिष्टमंडळाने इंडियन बँक असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुलकुमार गोयल यांची भेट घेतली.