देशाचा कारभार राष्ट्रीय पक्षांनी चालवावा आणि राज्याची सत्ता प्रादेशिक पक्षांकडेच असावी, अशी आपली भूमिका असून या भूमिकेवर आपण ठाम असून यामुळे यापुढे आपला पक्ष लोकसभा निवडणूक लढविणार नाही, असे राज ठाकरे यांनी सोमवारी येथे जाहीर केले. त्याचप्रमाणे केंद्र व राज्य यांच्यामध्ये नेमके अधिकार कसे असले पाहिजेत, हा विषय घेऊन लढा देणार असल्याचे राज म्हणाले.
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी, सोमवारी राज यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत मनसेच्या आगामी काळातील वाटचालीबद्दल मते मांडली. यापुढे लोकसभेपेक्षा विधानसभेवरच जास्त लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगतानाच केंद्र व राज्य यांच्यातील नेमक्या अधिकारांवर लढा देणार असल्याचे ते म्हणाले. राज्यात प्रादेशिक पक्षांचीच सत्ता असणे आवश्यक असून तेच राज्याचा विकास करू शकतील, अशी भूमिका राज यांनी मांडली. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनीही केंद्राला गुजरातकडून कर मिळणार नाही, अशी भूमिका मांडली होती. राज्यांनी केंद्राला कर देऊ नये असे आपले म्हणणे नाही. तथापि, राज्याशी संबंधित निर्णय घेण्याचे अधिकार राज्यांना मिळाले पाहिजेत, असे ते म्हणाले.
नरेंद्र मोदी यांना अफजलखानापासून दिल्ली की बिल्लीपर्यंत उपमा देणाऱ्या शिवसेनेने आपला मंत्री अजूनही केंद्रीय मंत्रिमंडळात का ठेवला, असा सवाल करत केंद्रात व पालिकेत भाजपशी संबंध ठेवले ते केवळ ‘इन्कम सोर्स’साठीच, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला. बीकेसीतील भाषणात उद्धव ठाकरे मोठी घोषणा करणार असे सांगण्यात आले होते ती घोषणा का झाली नाही, कोठे गेली ती घोषणा, असा सवालही राज यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा