अनधिकृत इमारती बांधणा-या बिल्डरांना स्थानिक नगरसेवक, आमदार यांचा पाठिंबा असून त्यांच्यावर कारवाई करण्याची कुणाचीही हिंमत होत नाही. मताच्या राजकारणासाठी अनधिकृत बांधकामांना अधिकृत केले जात आहे, त्यामुळे अनधिकृत इमारतींमध्ये राहणा-या रहिवाशांचं पुर्नवसन करावं यासाठी उद्या (गुरूवार) ठाण्यात पुकारण्यात आलेल्या बंदला मनसेचा पाठिंबा नाही असे जाहीर करत नागरिकांनीही या बंदमध्ये सहभागी होऊ नये असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केले. तसेच या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार असल्याचं ते म्हणाले.
ठाण्यात पडलेल्या अधिकृत इमारतीवर राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्र दौ-यातच भाष्य केले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी शरद पवारांनी ही सर्व बांधकामे अधिकृत करण्याचे सुतोवाच केल्यामुळे राजकीय विश्वात खळबळ उडाली होती. त्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. आज (बुधवार) आपल्या कृष्णकुंज या निवासस्थानी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपला या अनधिकृत बांधकामांना विरोध असल्याचे सांगत, या इमारती बांधणा-या बिल्डरांवर कारवाई होऊन त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, असं ते म्हणाले. तसेच माझ्या पक्षातील कोणत्याही व्यक्तीने अशा गोष्टींना पाठिंबा दिल्यास त्यांची ताबडतोब पक्षातून हकालपट्टी केली जाईल, हे देखिल त्यांनी जाहीर केले.

Story img Loader