ठाणे येथील राबोडी भागात गुरूवारी रात्री महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याच एका कार्यकर्त्यांच्या घरात घुसून त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी राबोडी पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून हे सर्वजण मनसे नगरसेविकेचे नातेवाईक आहेत. दरम्यान, पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
रणजीत वैती, विशाल पाटील, मनोज वैती, भूषण पाटील, जय पाटील, प्रेमा पाटील, मुक्ता वैती आणि संगिता पाटील, अशी अटक करण्यात आलेल्या आठ जणांची नावे असून हे सर्वजण राबोडी भागात राहतात. तसेच हे सर्वजण मनसे नगरसेविका रत्नप्रभा पाटील यांचे नातेवाईक असून त्यास रत्नप्रभा पाटील यांनी दुजोरा दिला आहे. राबोडी येथील पंचगंगा भागात राहणारे चंद्रकांत येरूणकर हे मनसेचे कार्यकर्ते असून त्यांना व त्यांच्या कुटूंबियांना मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा प्रकार पुर्व वैमनस्यातून घडला असल्याचे राबोडी पोलिसांनी सांगितले.
नगरसेविका रत्नप्रभा पाटील आणि चंद्रकांत येरूणकर या दोघांनी ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत एकाच पॅनलमधून मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढविली होती. यामध्ये रत्नप्रभा या विजयी झाल्या होत्या तर चंद्रकांत पराभूत झाले होते. मात्र, गुरूवारी झालेल्या घटनेमुळे या दोघांमधील वाद आता चव्हाटय़ावर आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा