मुंबई : दादरच्या शिवाजी पार्कच्या मैदानातील धूळीचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला असून आता या धुळीला राजकीय रंग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा प्रश्न उचलून धरला असून या धुळीच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पालिकेच्या जी उत्तर कार्यालयात शुक्रवारी आंदोलन केले. शिवाजीपार्क मैदानातील मातीने भरलेले मडके सहाय्यक आयुक्तांना देऊन मनसेने प्रशासनाचा निषेध केला. तसेच महिन्याभरात माती काढण्यात आली नाही तर मैदानातील माती कार्यालयासमोर आणून टाकण्याचा इशाराही मनसेने दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिवाळा आल्यामुळे मुंबईतील प्रदूषणातही वाढ झाली आहे. यामुळे शिवाजी पार्क मैदानातील लाल मातीच्या धुळीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मैदानातील माती काढण्याची रहिवाशांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. तब्बल ९८ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावरील या मैदानातून उडणाऱ्या धुळीची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. धुळीची समस्या दूर करण्यासाठी आतापर्यंत रहिवाशांनी अनेकदा पालिकेकडे पाठपुरावा केला. मात्र गेल्या कित्येक वर्षात या समस्येवर तोडगा निघू शकला नाही. आतापर्यंत रहिवासी संघटना या विषयावर आंदोलन करत होत्या. मात्र शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या विषयावर आंदोलन केले. विधानसभा निवडणुकीत मनसेला फटका बसल्यानंतर मनसेने या मतदारसंघातील प्रमुख विषय उचलून धरला. छत्रपती शिवाजी पार्क मैदानात पसरलेल्या धुळीवर ठोस उपाययोजना होत नसल्याने मनसेने शुक्रवारी पालिकेच्या जी/उत्तर विभागात पालिकेच्या सहाय्यक आयुक्ताना जाब विचारण्यासाठी आंदोलन केले. यावेळी मनसैनिक आणि पालिकेचे अधिकारी यांच्यात वादावादीही झाली.

हेही वाचा…शिवाजीनगर घुसमटलेलेच

मनसेचे उपाध्यक्ष व माहीम विधानासभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली पालिका कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी शिवाजीपार्क मैदानातील मातीने भरलेले मडके सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांना देण्यात आले. परिसरातील ज्येष्ठ नागरिक हितगुज करण्यासाठी फेरफटका मारण्यासाठी शिवाजी पार्क येथे येतात, लहान मुले बगीच्यात खेळण्यासाठी येतात सकाळ पासूनच मैदानावरील धूळ उडत असल्याने इथे येणाऱ्या प्रत्येकाला या धुळीचा सामना करावा लागतो. याठिकाणी हिरवळ व्हावी यासाठी लाल माती टाकण्यात आली. मात्र हवेतून ही धूळ नागरिकांच्या नाका तोंडात, घरात गेली इथली झाडे, इमारती लाल मातीने माखल्या जात आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार याठिकाणी अडीचशे ट्रक लाल माती टाकली खरी पण याच धुळीचा त्रास आता इथल्या रहिवाशांना सहन करावा लागत असल्याचा आरोप किल्लेदार यांनी केला आहे.

हेही वाचा…कमी दृश्यमानतेमुळे मासळीही दिसेनाशी; यंदाच्या वर्षी सरंगा, बोंबिलाच्या दरात ७० टक्क्यांनी वाढ

दरम्यान, मैदानातील मातीचा थर काढायचा की नाही याबाबतचा निर्णय आयआयटीच्या अभ्यास अहवालानंतरच घेतला जाणार असल्याचे यावेळी आंबी यांनी आंदोलनकर्त्यांना स्पष्ट केले. मैदानातील मातीवर कोणत्या उपाययोजना करता येऊ शकतील याबाबत अहवालात सूचना केल्यानंतर त्यानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्तानी सांगितले.