विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मनोबल वाढविण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येत्या शनिवारी बहुसंख्येने ‘कृष्णकुंज’वर जमण्याचे ठरविले आहे. शनिवारी दुपारी तीन वाजता ‘कृष्णकुंज’वर या, अशा स्वरुपाचे आवाहन करणाऱया पोस्ट सध्या फेसबुकवर मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. मनसेच्याच विविध कार्यकर्त्यांकडून या पोस्ट प्रसिद्ध करण्यात येत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अधिकृतपणे शनिवारी कोणालाही ‘कृष्णकुंज’वर बोलावले नसल्याचे समजते.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला केवळ एकाच जागेवर यश मिळाले. जुन्नरमधून पक्षाच्या तिकीटावर लढणारे शरद सोनावणे हे एकमेव उमेदवार विजयी झाले आहेत. पक्षाच्या उर्वरित सर्व उमेदवारांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी हरवले. गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे १३ उमेदवार विजयी झाले होते. मुंबई, नाशिक या दोन्ही ठिकाणी २००९ मधील निवडणुकीत मनसेला चांगले यश मिळाले होते. मात्र, या निवडणुकीत मुंबईसह नाशिक व इतर सर्वच ठिकाणी मनसेचे उमेदवार पराभूत झाले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंटही सादर केली होती. मात्र, मतदारांनी त्यांच्या ब्ल्यू प्रिंटकडे साफपणे दुर्लक्ष केल्याचे निकालांवरून दिसून आले. या सर्व पार्श्वभूमीवर पक्षाच्या पराभवानंतरही आम्ही तुमच्यासोबत आहोत, हे सांगण्यासाठीच वेगवेगळ्या ठिकाणचे कार्यकर्ते शनिवारी दुपारी ‘कृष्णकुंज’वर जमणार आहेत.

Story img Loader