मुंबई : मुंबई महापालिकेच्या धर्तीवर येत्या २६ एप्रिल रोजी मनसे प्रतिसभागृह भरवणार आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात हे प्रतिसभागृह भरविण्यात येणार असून यासाठी मनसेने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केले आहे. शिवसेनेचे (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच प्रतिसभागृहासाठी आदित्य ठाकरे यांना मनसेने निमंत्रण दिल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई महापालिकेची मुदत संपून तीन वर्षे झाली असून मुंबई महापालिका सभागृहाची बैठक झालेली नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर प्रतिसभागृह भरवण्याची घोषणा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी नुकतीच केली आहे. या प्रतिसभागृहासाठी आदित्य ठाकरे यांच्यासोबत राज्यातील इतर सर्व प्रमुख पक्षांच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
राज्यात सध्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघे बंधू एकत्र येणार असल्याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आल्याने या चर्चेला उधाण आले आहे.
राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत महाराष्ट्र हित लक्षात घेता, उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याची साद घातली होती. या राजकीय टाळीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. त्यातच मनसेने आदित्य ठाकरे यांना आमंत्रित करून आणखी एकदा साद घातल्याची चर्चा आहे.येत्या २६ एप्रिल रोजी मुंबईतील मुंबई मराठी पत्रकार संघात या प्रतिसभागृहाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रतिसभागृहासाठी मनसेकडून आदित्य ठाकरे यांच्याबरोबरच भाजपाचे आशिष शेलार, समाजवादी पक्षाचे रईस शेख, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या राखी जाधव, मुंबई काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे आणि शिवसेना मंत्री उदय सामंत यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून चर्चा करा
यासंदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जवळपास सर्वच राजकीय पक्षातील प्रमुख नेत्यांना पत्र पाठवले आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फुटावी, महानगरपालिका प्रशासनाला या प्रश्नांची जाणीव व्हावी व त्यावर मार्ग निघावा यासाठी हे चर्चेचे व्यासपीठ आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून फक्त नागरिकांच्या समस्यांवर चर्चा व्हावी हा उद्देश आहे, असे संदीप देशपांडे यांनी या पत्रात म्हटले आहे.