सत्ताधाऱ्यांना जागं करण्यासाठी खळखट्याकची शैली असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आपल्या अनोख्या आंदोलनांसाठीही प्रसिद्ध आहे. असेच एक अनोखे आंदोलन मनेसेने आज डोंबिवली महापालिकेत केले. शहरातील बंद असलेले सावित्रीबाई फुले नाट्यगृह पुन्हा सुरु करण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या आंदोलनाच्या विषयाशी संबंधी अनोखे आंदोलन केले. याद्वारे त्यांनी आपली मागणी पालिका प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

सावित्रीबाई फुले नाट्यगृह गेल्या चार महिन्यांपासून दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. सध्याच्या सुट्ट्यांच्या काळातच हे नाट्यगृह बंद ठेवण्यात आल्याने नाट्यरसिक नाराज आहेत. कारण त्यांना आपल्या भागातील नाट्यगृहात जाऊन नाटक पाहण्याच्या संधीला मुकावे लागत आहे.

त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी डोंबिवलीकरांची ही मागणी अनोख्या पद्धतीने पोलिकेसमोर मांडण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी अलबत्या गलबत्या, तो मी नव्हेच, वस्त्रहरण, नटसम्राट आणि डॉ. काशीनाथ घाणेकर या नाटक आणि चित्रपटातील पात्रांचे वेश परिधान करुन पालिकेत प्रवेश केला. तसेच केडीएमसीत उपायुक्तांच्या कार्यालयात जाऊन लवकरात लवकर सावित्रीबाई फुले नाट्यगृह सुरु करावे अशा आशयाचे निवेदन दिले.

मनसेच्या या अनोख्या आंदोलनाची परिसराच चांगलीच चर्चा रंगली होती. नाटकांच्या डायलॉगच्या रुपात आपली मागणी मांडणारी ही पात्रे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती.

Story img Loader