लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : सोनसाखळी चोराला अटक करण्यासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांच्या पथकावर आंबिवली रेल्वे स्थानकाजवळ दगडफेक करण्यात आली. सोनसाखळी चोराला पोलिसांच्या तावडीतून सोडवण्यासाठी ही दगडफेक करण्यात आली असून त्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस जखमी झाले आहेत. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खडकपाडा पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अंधेरी येथील एमआयडीसी पोलीस ठाण्याचे एक पथक सोनसाखळी चोराच्या शोधात कर्जतपासून सुमारे ६ किमी अंतरावरील आंबिवली गावात गेले होते. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आंबिवली रेल्वे स्थानकाजवळ या आरोपीच्या साथीदारांबरोबर पोलिसांची झटापट झाली. सोनसाखळी चोराचे साथीदार त्याला सोडण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकत होते. त्यावेळी पोलिसांनी आंबिवली रेल्वे स्थानकाच्या कार्यालयात आसरा घेतला, मात्र जमावाने त्यांचा पाठलाग केला व आरोपीला सोडवण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच आजूबाजूने लोक जमा झाले. त्यांनी जमाव करून थेट पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. या घटनेची चित्रफीत समाज माध्यमांवर चांगलीच व्हायरल झाली आहे. या चित्रफितीत जमाव रेल्वे रुळांवरील दगड उचलून पोलीस व रेल्वे कर्मचाऱ्यांच्या दिशेने फेकताना दिसून येत आहे. जमावात महिलांचाही समावेश होता. त्याही अटक केलेल्या आरोपीला सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत होत्या.
आणखी वाचा-मुंबई : कार्यालयात आढळलेल्या घोरपडीचा बचाव
या घटनेत रेल्वेचे मालमत्ता नुकसान झाले असून रेल्वे स्थानकातील काचाही फुटल्या आहेत. सुदैवाने या दगडफेकीमुळे रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही, पण या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळ हे ठाणे पोलीस हद्दीत असल्याने पुढील तपास ठाणे पोलिसांकडून केला जात आहे, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले. खडकपाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या १०९, १३२, १२१, ३५२ आणि ३५१ कलमांखाली ३०-३५ अज्ञात दगडफेक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून चार जणांना अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, इतर आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. आंबिवली गावात या आधीही अशा घटना घडल्या आहेत, पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करून आरोपींना अटक होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न तिथे करण्यात आला आहे. पोलिसांनी या पूर्वीही येथील परिसरात कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ते अपयशी ठरले. त्यामुळे आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांना विशेष काळजी घेऊन तेथे जावे लागते.