मुंबईतील बेस्टच्या बस थांब्यांवर लवकरच मोबाइल चार्जिंग, वायफाय, दिव्यांगांसाठी ब्रेललिपी चिन्हे आदी विविध सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. येत्या वर्षभरात एक हजार ५६० बस थांब्यांचे नूतनीकरण आणि पुनर्बांधणी करण्यात येणार असून यापैकी १० बस थांब्यांवर प्रायोगिक तत्त्वावर प्रवासी सुविधा उपलब्ध करण्याचा बेस्टचा मानस आहे. या बस थांब्यांवर सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात येणार आहेत.
हेही वाचा- विश्लेषण : मुंबईतील स्थलांतरित प्रवाळ वाचणार का? त्यांचे महत्त्व काय?
बेस्ट उपक्रमाने हरित, सौरऊर्जेची निर्मिती करणारे आणि प्रवासी सुविधांनी सुसज्ज असे बस थांबे विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबईत तीन हजारांहून अधिक बस थांबे आहेत. यापैकी काही बस थांबे हरित, तर काही थांब्यावर सौरऊर्जा निर्मिती करण्यास सुरुवात झाली केली. आता एक हजार ५६० बस थांब्यांचे नूतनीकरण आणि पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. सुमारे १०० दिवसांमध्ये २६० बस थांब्यांचे, तर ३०० दिवसांमध्ये ऊर्वरित बस थांब्यांचे नूतनीकरण करण्यात येणार असल्याची माहिती उपक्रमाने दिली.
हेही वाचा- धारावी पुनर्विकासात अपात्र रहिवाशांनाही घरे; चार चटई क्षेत्र निर्देशांकाचा वापर
१,५६० पैकी पहिल्या दहा बस थांब्यांची पुनर्बांधणी करताना तेथे प्रवासी सुविधा उपलब्ध करण्यात येतील, असे बेस्ट उपक्रमातील अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रथम मरिन ड्राईव्ह आणि हाजीआली येथील थांब्यावर प्रवासी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. उर्वरित बस थांबे हे पर्यावरणपूरक असतील. तसेच तेथे अत्याधुनिक माहिती फलकांसह विविध सुविधा उपलब्ध असतील, असे उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले. जाहिरातींसाठी काही बस थांबे कंपन्यांना देण्यात आले आहेत. या बस थांब्यांचे नूतनीकरण आणि पुनर्बांधणी या कंपन्याच करणार असल्याचे त्यांची स्पष्ट केले.
नूतनीकरण, पुनर्बांधणीनंतर १० थांब्यांवर या सुविधा मिळणार
उत्तम आसन व्यवस्था, काचेचे छत, दिव्यांग प्रवाशांसाठी सांकेतिक ब्रेललिपी, सीसी टीव्ही कॅमेरा, वायफाय, चार्जिंग, सार्वजनिक शेअरिंग सायकल सेवा, पॅनिक बटन, वाचनालय किंवा ई-वाचनालय सेवा, प्रथमोपचार पेटी उद्योगपती आणि महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी काही महिन्यांपूर्वी व्टिटरद्वारे महालक्ष्मी रेसकोर्स येथील एका बस थांब्याचे कौतुक केले होते. व्यायाम करण्यासाठी उपकरणे, हिरवे छत यांसारख्या नाविन्यपूर्ण वैशिष्टांसह बस थांबे पाहणे खूपच छान आहे, असे त्यांच्या व्टिटमध्ये नमूद करण्यात आले होते. समाजमाध्यमांवर या थांब्याच्या छायाचित्रे प्रसारित झाली होती. नागरिकांनीही या थांब्याबद्दल बेस्ट उपक्रमाचे कौतुक केले होते.