लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (एमएमएमओसीएल) ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांदरम्यान १५०० खांबांवर मायक्रो टेलिकॉम टॉवर्स बसविण्यास परवानगी दिली आहे. या उपक्रमातून एमएमएमओसीएलला पुढील १० वर्षांत अतिरिक्त १२० कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे. तर दुसरीकडे मेट्रो प्रवासादरम्यान मोबाइल नेटवर्क खंडीत होणार नाही. त्यामुळे प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
मेट्रो प्रकल्पातून तिकिटाव्यतिरिक्त इतर पर्यायातून उत्पन्न कसे उपलब्ध होईल यादृष्टीने एमएमएमओसीएल विचार करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकेतील खांबांवर मायक्रो सेल उपकरणे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे ३५ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिकांवरील सुमारे १५०० खांबांवर ही उपकरणे बसविण्यास परवानगी देण्यात आली आहे. यातून एमएमएमओसीएलला १० वर्षांत १२० कोटी रुपये महसूल मिळणार आहे. या निर्णयाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १२ खांबांवर मायक्रो सेल उपकरण बसविण्यात येणार असून दूरसंचार क्षेत्रातील पायाभूत सुविधा पुरविणाऱ्या इंडस टॉवर्स या कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. यातून (१२ खांब) एमएमएमओसीएलला पुढील १० वर्षांत एक कोटींचा महसूल मिळणार आहे.
या उपक्रमातून एमएमएमओसीएलला उत्पन्न मिळणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांनाही याचा फायदा होणार आहे. मेट्रो प्रवासादरम्यान मोबाइलचे नेटवर्क खंडित होणार नाही. तर मेट्रो मार्गिकेखालील रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना आणि आसपासच्या परिसरातील पादचाऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे.