करोनाविषयक कडक निर्बंध हटविल्यानंतर हळूहळू सर्व कारभार पूर्ववत झाला असून रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई उपनगरीय रेल्वे आणि मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाइल चोरणाऱ्या चोरांचा सुळसुळाट झाला असून मोबाइल चोरी केवळ प्रवाशांनाच नव्हे तर आता लोहमार्ग पोलिसांनाही डोकेदुखी बनली आहे. चोरीला गेलेल्या मोबाइलचा माग काढत लोहमार्ग पोलिसांना परराज्याची वाट धरावी लागत आहे. २०२१ पासून आतापर्यंत प्रवासादरम्यान १० हजार १५९ प्रवाशांचे मोबाइल चोरीला गेले असून यापैकी दोन हजार ६१८ मोबाइल परराज्यातून हस्तगत करण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.
हेही वाचा >>> आरे – दहिसर – डहाणूकर मार्गावरील सायकल सफरीला गती ; दिवसाला ७६६ जणांची सायकल स्वारी तर १२४० फेऱ्या
गेल्या काही वर्षांपासून मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वेच्या हद्दीत मोबाइल चोरीचे प्रमाण वाढले आहे. अनेक प्रवाशांचे महागडे स्मार्ट फोन हेरून चोर त्यावर डल्ला मारतात. रुळांजवळील खांबाच्या मागे लपून लोकलच्या दरवाजात उभ्या प्रवाशांच्या हातातील मोबाइल हिसकवून पळ काढायचे प्रकार सर्रास घडू लागले आहेत. अनेक प्रवासी लोकल प्रवासात किंवा फलाटावर मोबाइलवर बोलण्यात दंग असतात. हेच हेरून चोर प्रवाशांचा मोबाइल हिसकावून पळ काढतात. मुंबईत मेल-एक्स्प्रमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीतही असे प्रकार घडत आहेत. मुंबई विभागात जानेवारी २०२१ पासून ऑगस्ट २०२२ पर्यंत १० हजार १५० मोबाइल चोरीचे गुन्हे लोहमार्ग पोलिसांकडे नोंद झाले आहेत. यापैकी तीन हजार ७४३ गुन्ह्यांची उकल झाली असून दोन हजार ६१८ मोबाइल परराज्यातून हस्तगत करण्यात आले आहेत. अनेक वेळा चोरलेले मोबाइल परराज्यात विकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.
हेही वाचा >>> मुंबई : देशातील पहिले कांदळवन उद्यान गोराईत, सिंगापूरच्या धर्तीवर साकारले जाणार
मुंबई विभागातून चोरीला गेलेले मोबाइल महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, दिल्ली, हरियाणा, पंजाब, केरळ, जम्मू काश्मिरसह अन्य राज्यांतून हस्तगत करण्यात आले आहेत. चोरीला गेलेले मोबाइल परराज्यातून हस्तगत करण्यासाठी लोहमार्ग पोलिसांचे विशेष पथकही तैनात करण्यात येते.
मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मुंबई लोहमार्ग हद्दीत मोबाईल चोरीचे गुन्हे
मध्य रेल्वे
२०२१
दाखल गुन्हे – २६७४
उकल झालेले गुन्हे -१००५
२०२२
दाखल गुन्हे – ४०३९
उकल झालेले गुन्हे – १२७३
हेही वाचा >>> सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणी
पश्चिम रेल्वे
२०२१
दाखल गुन्हे – १३९५
उकल झालेले गुन्हे – ६७८
२०२२
दाखल गुन्हे – २०५१
उकल झालेले गुन्हे -७८७