वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे नागरिकांनी मोबाईलवर फोटो काढायचे आणि ते वाहतूक पोलिसांना इ-मेलवर पाठवायचे, त्याआधारे संबंधितांना नोटीस पाठवून समज देता येऊ शकते. मात्र, कायद्यामध्ये यासंबंधी कोणतीही तरतूद नसल्याने प्रायोगिक तत्वावर असा प्रयोग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.
ठाणे येथील डॉ. बेडेकर महाविद्यालयामध्ये राज्य महामार्ग पोलिसांनी रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाप्रसंगी राज्यमंत्री सतेज पाटील, राज्य महामार्गचे अप्पर पोलीस महासंचालक विजय कांबळे, पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर, ठाणे पोलीस आयुक्त के.पी. रघुवंशी, महाविद्यालयाचे पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. राज्य महामार्ग पोलिसांनी घेतलेल्या स्पर्धामधील विजेत्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. राज्य शासनाकडून विकास कामांसाठी उपलब्ध होणाऱ्या निधीमधील १० टक्के रक्कम महापालिका तसेच नगरपालिकांनी वाहतूक व्यवस्थेसाठीच खर्च करावी. तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी मंजुर करण्यात आलेल्या बजेटमधील पाच टक्के रक्कम वाहतूक व्यवस्थेसाठीच खर्च करावी, त्यामध्ये सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग पट्टे, आदी कामांचा समावेश असेल, असा अध्यादेश राज्य शासनाने नुकताच काढला असल्याची माहितीही सतेज पाटील यांनी दिली.
रस्ता सुरक्षा अभियान हा कार्यक्रम सरकारी नाही, तो तुमच्या आयुष्याशी निगडीत असल्याने राबविला जात आहे. तुम्ही ज्या जिद्द व चिकाटीने अभ्यास करता, त्याच पद्धतीने या अभियानामध्येही सहभागी झाले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून दिला. ज्या आई-वडीलांनी आपल्याला वाढविले, त्यांना आपण नापास झाल्यावर दु:ख वाटते. पण, त्यांच्यापासून कायमचे दूर गेल्यावर त्यांची अवस्था काय असले, याची कल्पना करा आणि कुटुंबांचे महत्व ओळखून वागायला शिका तसेच वाहतूकीचे नियम पाळा, असेही त्यांनी सांगितले. सध्या छेडछाडीसंदर्भात कायदा करण्याची वेळ का आली आहे, याचा तरुण पिढीने विचार केला पाहिजे. आपण आपली संस्कृती विसरत चाललो आहे, त्यामुळे २१ शतकातली पिढी सुसंस्कृत झाली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. इंटरनेट माध्यम जितके चांगले तितकेच वाईट आहे. पण, त्याच्यातील नेमका फरक तरुण पिढीला कळलेला नाही. दुरच्या मित्राशी आपण फेसबुकवरून गप्पा मारतो, पण जवळच्या मित्राला आपण विसरत चाललो आहोत, याचे भानच राहिलेले नाही. त्यामुळे मैत्री करण्याची आणि जपाण्याची भुमिका बजाविण्यास तसेच फेसबुक वापरण्यांनी स्वत:वर बंधने घालण्यास शिकले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.